अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे परळमधील रहिवासी हैराण, पालिकेच्या एफ दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी घातला घेराव

अपुऱ्या पाणी पुरवठय़ामुळे हैराण झालेल्या परळमधील रहिवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या एफ दक्षिण विभागावर मोर्चा काढला. अधिकाऱ्यांना घेराव घालत ‘पाणी द्या… पाणी द्या… नाहीतर खुर्च्या खाली करा,’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
एफ दक्षिण विभागाच्या परिसरात असलेल्या प्रभाग क्रमांक 204 येथील शहापूरजी पालनजी वसाहत, आंबेवाडी, तावरी पाडा, दत्ताराम लाड मार्ग परिसरामध्ये कित्येक दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा आहे. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः झोपडपट्टीमधील नागरिकांना कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे ते हैराण झाले आहेत. यासंदर्भात पालिकेकडे सातत्याने तक्रार देऊनसुद्धा काहीही फरक पडला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी एफ दक्षिण कार्यालयातील पाणी खाते विभागातील अधिकाऱ्यांना घेराव घातला. शाखाप्रमुख किरण तावडे, कांचन घाणेकर, स्मिता आंबावले, स्वाती पुंभार, उपशाखाप्रमुख विजय मोडक, मुन्ना मिश्रा तसेच शिवसैनिक आणि रहिवाशी या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.