क्रिकेट्वरी – हे भाषण मला कधी सोडेल!

>>
दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा इंग्लंड 3 बाद 77. मग तिसऱ्या सकाळी मोहम्मद सिराजने ज्यो रूट आणि कप्तान बेन स्टोक्सला लागोपाठच्या चेंडूवर बाद केलं. इंग्लंड 5 बाद 84… हिंदुस्थानी संघाचा आनंद अख्ख्या एजबॅस्टनमध्ये मावत नव्हता. कप्तान गिलला सामना खिशात आल्यासारखंही वाटलेलं असू शकेल! मात्र त्यानंतर हॅरी ब्रूक आणि यष्टिरक्षक जेमी स्मिथ एकत्र आले आणि साराच सूर बदलून गेला. बेबंद फटकेबाजी करत दोघांनीही धडाकेबाज शतकं झळकवली. त्यांच्या द्विशतकी भागीदारीदरम्यान ‘ये बॅझबॉल कब मुझे छोडेगा…’, असंच कुठलं तरी गाणं हिंदुस्थानी संघाने गायलं असेल!
अर्थात, पाच इंग्लिश फलंदाज बाद केल्यानंतर कप्तान गिलने एवढा बचावात्मक पवित्रा का घेतला हे एक कोडंच आहे. स्लिपचा परिसर उजाड पडलेला, आखूड टप्प्याचे चेंडू गायब. प्रसिधने प्रयत्न केला, पण त्याचा वेग कमी पडला आणि त्याला पुन्हा एकदा ‘पडली’. सहापेक्षा अधिक सरासरीने त्याने अक्षता वाटल्या. आता मात्र त्याला तेवढं अप्रसिद्ध करणं योग्य ठरेल! नितीशच्या पहिल्याच षटकामध्ये एक अवघड संधी मिळाली, पण चेंडू पंतसाठी थोडा पुढे पडला.
असो, एकुणात तिसरा दिवस आपल्यासाठी फारसा आशा दाखवणारा नव्हता. किंबहुना, आशांवर विरजण घालणाराच ठरला. चहापानापर्यंत इंग्लंड 5 बाद 355. ब्रूक नाबाद 140 आणि स्मिथ नाबाद 157. दोघांनी 271 धावांची नाबाद भागीदारी केवळ 354 चेंडूंत आपल्या माथी मारली. हे दोघं यापुढे किती मोठे दिवे लावतायत तेच बघायचं!
Comments are closed.