राज्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी

राज्यात शिक्षक भरती बंदी असतानाही नागपूर आणि अनेक जिह्यांतील शाळांमध्ये 2019 ते 2025 या काळात सर्वाधिक बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले. या प्रकरणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून 10 ते 30 लाख रुपये उकळले. तसेच या शिक्षकांना 5 वर्षे वेतनही देण्यात आले. या बोगस शिक्षक भरती घोटाळय़ाची व्याप्ती पाहता या प्रकरणी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.

विधान परिषदेत याबाबत सुधाकर अडबाले यांनी तीन समित्यांनी अहवाल दिल्यानंतर कारवाई का झाली नाही, 18 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना बडतर्फ करणार का, त्यांची संपत्ती जप्त करणार का, नागपूर नाही तर राज्यभरात हा घोटाळा झाला असून याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी, दोषींना अटक करावी, अशी मागणी सुधाकर अडबाले यांनी सरकारकडे केली. त्यावर पंकज भोयर यांनी उत्तर दिले. चर्चेत प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे, संदीप जोशी, परिणय फुके, अभिजीत वंजारी यांनी भाग घेतला.

चौकशी समितीत यांचा समावेश

पोलीस, शिक्षक उपसंचालकांकडून याची चौकशी सुरू आहेच. पण सदस्यांनी मागणी केल्यामुळे याप्रकरणी लवकरात लवकर आयएएस दर्जाचा, आयपीएस दर्जाचा आणि शक्य झाल्यास न्यायालयाच्या व्यवस्थापनातला अधिकारी यांची नियुक्ती करून एक राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्यात येईल, असे भोयर म्हणाले.

Comments are closed.