मुजोर केडियाचा माफीनामा, राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर

मी मराठी शिकणार नाही, बोलणार नाही. काय करायचे ते करा, अशी मुजोरी करणाऱ्या मराठीद्वेष्टा उद्योजक सुशील केडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर वठणीवर आला आहे. मी माझ्या चुकीबद्दल माफी मागतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर, कृतज्ञता वाटत आली आहे, असे म्हणत केडिया याने शरणागती पत्करली आहे.

राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला असताना मराठीद्वेष्ट्यांकडून अजूनही मराठी भाषेबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. मुंबईतील उद्योजक सुशील केडिया याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी 30 वर्षे मुंबईत राहतो. मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तुम्ही ज्या प्रकारे वर्तन करीत आहात ते पाहता मी हा पण केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठीचे कैवारी म्हणून वावरत आहेत तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोला. इतकेच नव्हे तर, दहशतवादी आणि राज ठाकरे यांच्या धोरणात काय फरक आहे, असा सवाल ‘एक्स’वर पोस्ट करत केडियाने मग्रुरी दाखवली होती.

केडिया एवढ्यावरच थांबला नाही, तर या पोस्टमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील त्याने टॅग केले होते. सुशील केडियाच्या या पोस्टनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केडियाच्या कार्यालयावर धडक देत दगडफेक केली व त्याच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर लगेच केडियाने नरमाईची भूमिका घेत ‘एक्स’वर राज ठाकरे यांची माफी मागितली.

काय म्हणाला केडिया…

मी केलेली पोस्ट चुकीच्या मानसिक अवस्थेत आणि तणावात लिहिली होती; पण माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. मी माझ्या चुकीबद्दल माफी मागतो. राज ठाकरे यांच्याबद्ल मला नेहमीच आदर आणि कृतज्ञता वाटत आली आहे. मी माझी चूक स्वीकारतो. मला आता जाणवत आहे की, मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी.

Comments are closed.