क्रिकेटवारी – आता अपेक्षा गोलंदाजांकडून!

<<< संजय कऱ्हाडे >>>

कालचा शुभमन गिल कप्तान होता, हिशेबनीस होता, अडाखेबाज होता, धैर्यवान होता अन् एक चित्तथरारक फलंदाज होता. इंग्लंडला चौथ्या डावात किती धावांचं आव्हान द्यायचं, त्यासाठी किती वेळ घ्यायचा, ते मोडून काढण्यासाठी किती षटकं आवश्यक ठरतील, बॅझबॉलचा दरारा दरवाज्याबाहेर कसा ठेवायचा ही सर्व गणितं गिलने त्याच्या डोक्यात मांडली अन् मग धडाकेबाज फलंदाजी केली. त्यापूर्वी पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या बॅझबॉलने घातलेला पिंगा त्याच्या डोक्यात नक्कीच घुमला असेल आणि पहिल्या डावातला ब्रूक-स्मिथचा झंझावातही. पण जॉश टंगच्या एका षटकात त्याने मारलेला षटकार आणि पुलचे दोन चौकार सर्व स्टॉपवर डबलघंटी वाजवणारे होते. या खेळीपर्यंतचे त्याचे पुल खुलेपणाने मारलेले नव्हते, शॉर्ट आर्म जॅब्स होते. आज मात्र वाटलं, स्वतःचंच द्विशतक तो साजरं करतोय! आणखी एक शतकाने! 129 चेंडूत शतक!

एकाच कसोटीत द्विशतक आणि शतक झळकवणाऱ्या सुनील गावसकरांच्या पंक्तीत शुभमन जाऊन बसलाय! 1971 साली आपल्या पहिल्याच विंडीज दौऱ्यावर गावसकरांनी पोर्ट ऑफ स्पेनला पहिल्या डावात 124 तर दुसऱ्या डावात 220 धावा चमकावल्या होत्या!

दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतची फलंदाजी, पहिल्या डावात केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त! आणि 58 चेंडूत 65 धावा म्हणजे संभाव्य विजयासाठी जमा केलेला अणुगोळाच! रिषभ आणि शुभमनदरम्यानचा खेळपट्टीवरचा संवाद दोन बंधूंच्या मनोमिलनासारखा दिसला!

राहुलने आपल्या अर्धशतकासह पायाभरणी केली. पण करुण नायरने मात्र निराशा केली. पहिल्या डावात उसळत्या चेंडूने त्याचा घात केला आणि दुसऱ्या डावात त्याला चीत केलं. चेंडू हनुवटीवर लागल्यानंतर ब्रायडन कार्सच्या पुढे पडलेल्या चेंडूवर तो अधुऱ्या मनाने खेळला, स्मिथकडे झेल देऊन बाद झाला. यापुढे प्रत्येक वेळी नायरची तशीच आरती ओवाळली गेली तर काही आश्चर्य नाही!

आज मात्र डोळे लागलेत ते एका उत्कंठा वाढवणाऱ्या चुरशीकडे. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार हिंदुस्थानी फलंदाजांनी कसा घेतला आणि पहिल्या डावातली इंग्लंडची बॅझबॉलबाजी पाहता मनात हुरहूर आहे. पण, अपेक्षा आहेत सिराज, आकाशदीप, नितिश, जडेजा आणि वॉशिंग्टनकडून! चेंडूची दिशा टप्पा सांभाळा, बाकीच्यांनो बॅटला लागून उडालेली लाल रंगाची प्रत्येक गोष्ट पकडा. त्याकरता उड्या मारा, झेपा टाका, ओंजळी वेळेत बंद करा, जे सगळं शक्य आहे ते करा. उंबरठ्यावरच्या पळीत आम्ही आमचा जीव काढून ठेवलाय!!

Comments are closed.