साक्षीने हिंदुस्थानच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं; मीनाक्षी, जुगनू, पूजा राणी यांना रौप्य

दोन वेळच्या युवा जागतिक विजेत्या साक्षा चौधरीने कझाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चषक स्पर्धेत दमदार ‘पंच’ लगावत हिंदुस्थानच्या सुवर्णपदकाचे खाते उघडले. महिलांच्या 54 किलो गटाच्या अंतिम फेरीत तिने अमेरिकेच्या योसलिन पेरेझवर एकतर्फी वर्चस्व गाजवीत सर्व पंचांकडून एकमताने विजय मिळविला. याचबरोबर मीनाक्षी, जुगनू व पूजा राणी या हिंदुस्थानी खेळाडूंना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

24 वर्षीय साक्षी चौधरीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत प्रभावी कॉम्बिनेशन पंचेसने प्रतिस्पर्धी योसलिनला निष्प्रभ केले. तिच्या या शानदार विजयामुळे हिंदुस्थानी ताफ्याने स्पर्धेत आपले पहिले सुवर्णपदक निश्चित केले. हिंदुस्थानी संघाची जागतिक बॉक्सिंग चषक स्पर्धेत ही आतापर्यंतची शानदार कामगिरी ठरली असून, हिंदुस्थानने या स्पर्धेत एकूण 11 पदके पक्की केली आहेत. रविवारी सकाळी पार पडलेल्या पहिल्या सत्रात चार हिंदुस्थानी बॉक्सर रिंगमध्ये उतरले होते. त्यांपैकी साक्षीने आपल्या उजव्या कामगिरीने पदकतालिकेत हिंदुस्थानचे नाव सर्वप्रथम सुवर्णात नोंदविले.

दरम्यान, महिलांच्या 48 किलो वजनी गटात मीनाक्षीने स्थानिक खेळाडू नाझीम किजैबायविरुद्ध विजयासाठी झुंज दिली; पण तिला 3-2 अशा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. पुरुषांच्या 85 किलो वजनी गटात जुगनूला कझाकिस्तानच्या बेकझाद नूरदौलेटोवकडून 0-5ने पराभव स्वीकारावा लागला, तर महिलांच्या 80 किलो वजनी गटात पूजा राणीला ऑस्ट्रेलियाच्या इसेटा फ्लिंटने नमवले. त्यामुळे दोघांनाही रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Comments are closed.