जे. जे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम संथगतीने, राज्य सरकारची विधानसभेत कबुली

भायखळा येथील जे. जे. रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या परिसरात 1 हजार 200 खाटांचे नवीन सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे, पण या रुग्णालायाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू असल्याचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने विधानसभेत मान्य केले आहे.

अंधेरीचे (पूर्व) आमदार मुरजी पटेल यांनी जे. जे रुग्णालयाच्या परिसरातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे. ‘जे. जे’ मध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचे काम 2019 मध्ये सुरू झाले, पण अद्यापपर्यंत एकाही विंगचे काम पूर्ण झालेले नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर या रुग्णालयाचे भाग ‘ए’ आणि भाग ‘बी’चे आरसीसी काम, लिफ्ट मशीन रूम, बाह्य विकासाचे काम सुरू असून जे. जे. रुग्णालय कार्यरत असल्याने रुग्णांची गैरसोय होत नसल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

या बांधकामाच्या कंत्राटदाराचे काम प्रलंबित असूनही कंत्राटदारावर कोणताही दंडात्मक कारवाई केली नाही हे खरे आहे काय, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रुग्णालय इमारतीचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण न केल्यामुळे पंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.

बांधकामाचा खर्च वाढला?

बांधकामाचा खर्च 2020 मध्ये 407 कोटी 16 लाख रुपये होता, पण हा खर्च वाढून 778 कोटी 75 लाख रुपयांपर्यंत गेल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, पण बांधकामाचा खर्च वाढलेला नाही असे लेखी उत्तरात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed.