पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; कोयत्यानं डोकं उडवण्याचा प्रयत्न, माथेफिरूला अटक

पुणे रेल्वे स्थानकाबाहेर अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एका माथेफिरूने रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. माथेफिरूने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केले आणि पुतळ्याचे मुंडके उडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी माथेफिरूला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. केशरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातलेल्या माथेफिरूने पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. माथेफिरूने चौथऱ्यावर चढून पुतळ्यावर कोयत्याने वार केले. यामुळे एकच खळबळ उडाली. रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या प्रवाशांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सूरज शुक्ला (वय – 32, सध्या रा. विश्रांतवाडी, पुणे, मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला रविवारी रात्रीच ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.

रंजनकुमा शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर

‘पोलिसांनी माथेफिरूला ताब्यात घेतले असून चौकशी दरम्यान त्याने आपले नाव सूरज आनंद शुक्ला असल्याचे सांगितले. तो मूळचा वाराणसी येथील रहिवासी असून एक-दीड महिन्यांपासून पुण्यात राहतो. पुण्यात तो विश्रांतवाडी येथे रहात असून रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तके विकण्याचे काम करतो. त्याने सातऱ्यातील वाई येथून कोयता घेतला होता. तो चौकशीत सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तर देत आहे, असे बंडगार्डन पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गांधी अमर आहेत… गांधी मरा नहीं करते!

दरम्यान, या संतापजनक घटनेचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. ‘पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. हा व्यक्ती महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथर्यावर चडलेला दिसतोय. त्याच्या हातात कोयताही दिसून येतोय. महात्मा गांधींची गोळ्या झाडून निघृण हत्या केली तरी ‘यांचे’ मन अजूनही भरले नाही म्हणून आता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर राग काढत आहेत. पण ‘या’ लोकांनी एक ध्यानात ठेवावे… गांधी अमर आहेत… गांधी मरा नहीं करते!’, असे रोहिणी खडसे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.

कॉंग्रेस अ‍ॅग्रीव्हर

दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसची चांगलीच आक्रमक झाली आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Comments are closed.