घाटकोपर मेट्रो स्थानकात चेंगराचेंगरीने घुसमट, रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा विस्कळीत

मुंबई मेट्रो वन मार्गावर सोमवारी सकाळच्या ‘पीक अवर्स’ला मेट्रो सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. वर्सोवा स्थानकातून घाटकोपरच्या दिशेने चाललेल्या मेट्रोच्या रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, संपूर्ण वेळापत्रक कोलमडल्याने वर्सोवा ते घाटकोपरपर्यंत सर्व स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. घाटकोपर स्थानकात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. तांत्रिक बिघाड झालेल्या गाडीची फेरी रद्द झाल्याने शेकडो प्रवाशी प्रवेशद्वारावरच खोळंबले. सकाळी साडेआठच्या सुमारास हा गोंधळ उडाला.

वर्सोव्यावरून घाटकोपरच्या दिशेने चाललेल्या मेट्रोच्या रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती गाडी वेग घेत नव्हती. अंधेरीच्या आझाद नगर स्थानकात गाडी येताच तांत्रिक बिघाड निदर्शनास आला. त्यामुळे ती गाडी पुढे न नेता वर्सोव्याला माघारी नेण्यात आली. त्यासाठी नियमित फेऱ्यांमध्ये बदल करावा लागल्याने या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकांत प्रवाशांची गर्दी वाढत गेली. गाड्यांचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यास जवळपास पाऊण तास लागला. ‘पीक अवर्स’ला वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन सेवेत सुधारणा करणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.

अरुंद प्लॅटफॉर्म, अपुऱ्या फेऱ्या

मेट्रो वन मार्गावरील वाढत्या प्रवाशी संख्येच्या तुलनेत सुविधांचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे तांत्रिक बिघाडाच्या काळात स्थानकांत चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवत आहे. अरुंद
प्लॅटफॉर्म, फेऱ्यांची कमी संख्या व कमी कोचच्या ट्रेन या कारणांचा मेट्रो सेवेवर परिणाम होत आहे. सरकारने तातडीने सुविधांचा विस्तार करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Comments are closed.