गॅलवान पर्यटकांसाठी खुला असेल
शौर्याची जाणीव करून देणारे ठिकाण : ‘रणभूमी दर्शन’ कार्यक्रम सुरू
वृत्तसंस्था/ लेह
15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या हिंसक झटापटीत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते, तर चीनलाही मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. आता 5 वर्षांनी पुन्हा एकदा गलवान चर्चेत येणार आहे. गलवान येथे जात पर्यटकांना तेथील अनुभव घेता येणार आहे. युद्धस्मारक अणि कॅफेटेरियासमवेत अन्य आवश्यक सुविधांची निर्मिती आता अंतिम टप्प्यात आहे. चालू महिन्यात गलवान वॉर मेमोरियल देशाला समर्पित केले जाऊ शकते.
‘भारत रणभूमी दर्शन’ कार्यक्रमाद्वारे गलवान आता देशवासीयांसाठी खुले करण्यात येणार आहे. यानुसार तेथे तयारी करण्यात येत आहे. परंतु प्रतिकूल स्थिती अन् हवामानामुळे तयारीला अधिक वेळ लागला आहे. डीएसडीबीओ रोड म्हणजेच दुर्बक-श्योक-दौलत बेग ओल्डी रोडवरून श्योक गावापर्यंत लोकांना जाता येत होते, परंतु 2020 सालच्या घटनेनंतर या भागात स्थानिक रहिवासी आणि सैन्याशिवाय अन्य कुणालाही प्रवेशाची अनुमती नाही. भारतीय सैन्याने स्वत:च्या शूर हुतात्मा सैनिकांच्या सन्मानार्थ केएम 120 पोस्टवर गलवान वॉर मेमोरियल निर्माण केले आहे.
पर्यटकांसाठी गेस्ट हाउस
गलवानपर्यंत पोहोचण्यासाठी लेहपासून चांगला खिंडमार्गे दुर्बुक आणि मग थेट श्योक गावातून जावे लागणार आहे. दुर्बक येथून एक मार्ग पँगोंग लेकपर्यंत जातो तर दुसरा मार्ग थेट दौलत बेग ओल्डीच्या दिशेने जातो. या मार्गावर अखेरचे गाव श्योक आहे. या मार्गावर वास्तव्य अन् खाण्या-पिण्याची कुठलीही खास व्यवस्था नव्हती. परंतु आता पर्यटकांसाठी कॅफेटेरिया, गेस्ट हाउस आणि अन्य सुविधांसाठी अस्थायी निर्मिती केली जातेय. सैन्याचे कॅफे जवळपास तयार आहेत. तसेच श्योक गावात होम स्टेचाही प्रस्ताव आहे. तर ग्रामस्थांच्या इच्छेनुसार स्थानिक प्रशासनही मदत करत आहे.
पर्यटकांना आता या भागात येण्यासाठी इनर लाइन परमिट घेण्याच्या समस्येपासूनही मुक्ती मिळणार आहे. पर्यटकांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी इनर लाइन परमिटची गरज भासणार नाही, परंतु नोंदणी आवश्यक असेल. तसेच नोंदणी ऑनलाइनही होऊ शकेल आणि याकरता केंद्रंही असतील. अधिक उंचीवरील भागात आवश्यक वैद्यकीय दिशानिर्देशांचे पालन पर्यटकांना करावे लागणार आहे.
रणभूमी दर्शन
रणक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘भारत रणभूमी दर्शन’ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याकरता हे नाव असलेली एक वेबसाइट तयार करण्यात आली असून याद्वारे ‘शौर्य गंतव्य’ सियाचीन बेस कॅम्प, लिपुलेख खिंड, बूमला, किबितु समवेत गलवान आणि डोकलामही लोक पाहू शकतील. या ठिकाणांवर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. देशाच्या सर्व लोकांना शूरवीरांच्या गाथांची जाणीव असावी, याकरता पूर्ण विस्तृत योजना तयार करण्यात आली आहे. शौर्य स्मारकाच्या स्वरुपात गलवान वॉर मेमोरियलसोबत तवांग, लोंगेवाला, सियाचीन वॉर मेमोरियल, ऑपरेशन मेघदूत मेमोरियल, जसवंतगढ वॉर मेमोरियलला सामील करण्यात आले आहे. शौर्यगाथेमध्ये 1947-48 भारत-पाकिस्तान युद्ध, 1962 चे युद्ध, 1965 चे भारत-पाकिस्तान युद्ध, बांगलादेश मुक्तिसंग्राम, ऑपरेशन मेघदूत, 1999 चे कारगिल युद्ध सामील आहे.
Comments are closed.