ईव्हीएम हटाव… देश बचाव…मारकडवाडीतील ग्रामस्थांची विधान भवनावर धडक; पोलिसांकडून अनेक निदर्शकांना अटक

ईव्हीएमविरोधात सोलापूरच्या मारकडवाडीतील ग्रामस्थांनी आज विधान भवनाबाहेर जोरदार आंदोलन केले. ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ असे फलक झळकावत त्यांनी ईव्हीएमविरोधात घोषणाही दिल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे विधान भवनाबाहेर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. ग्रामस्थांच्या हातातील फलक हिसकावून घेण्यासाठी पोलिसांनी अक्षरशः त्यांच्या अंगावर उडय़ा घेतल्या. अनेक ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मारकडवाडीतील ग्रामस्थांनी केला होता. भाजपने ईव्हीएममध्ये घोटाळा करून सत्ता मिळवली हे सिद्ध करण्यासाठी मारकडवाडीत मतपत्रिकांवर मतदान घेण्यासाठी मॉक पोलही घेतला जाणार होता. परंतु पितळ उघडे पडेल या भीतीने तो सत्ताधाऱ्यांनी होऊ दिला नव्हता. निवडणूक आयोगानेही मारकडवाडीतील ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे कानाडोळा केला होता.

आज दुपारी विधान भवनात दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू असताना विधान भवनाबाहेर मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएमविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु आक्रमक झालेले ग्रामस्थ काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही त्यांची घोषणाबाजी सुरूच राहिली.

Comments are closed.