Avinash Jadhav Detained : मराठीसाठी मनसे मैदानात,सरकारकडून कारवाई;अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, मोर्चापूर्वीच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. काल रात्री पहाटे साडेतीन वाजता काशीमीरा पोलिसांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. तसेच, वसई विरारमधील अनेक पदाधिकाऱ्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी कारवाई केली असली तरी, “मोर्चा निघणारच” असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व अविनाश जाधव करणार होते, तर मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे देखील सहभागी होणार होते. मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध इतर भाषिकांचा वाद उफाळून आला होता, ज्यात मराठीविरोधात स्थानिक इतर भाषिकांनी आक्रमक मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर मनसेने हा मोर्चा आयोजित केला आहे. अविनाश जाधव यांनी समाज माध्यमांवर मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.

Comments are closed.