Happy Birthday Sourav Ganguly; ‘दादा’ची दहशत अजूनही कायम! हे 5 विक्रम आजही अबाधित

Happy Birthday Sourav Ganguly: भारतीय क्रिकेटमधील आक्रमक नेतृत्वाचे प्रतीक ठरलेला माजी कर्णधार सौरव गांगुली आज 53 वर्षांचा झाला आहे. ‘दादा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या गांगुलीने केवळ फलंदाजीच नव्हे तर भारतीय संघाच्या आत्मविश्वासातही मोठी भर घातली. त्यांनी घडवलेले अनेक विक्रम आजही टिकून आहेत.

गांगुलीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून अनेक वर्षे उलटली असली, तरी त्याचे विक्रम आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. या खास दिवशी पाहूया, दादाचे असे पाच विक्रम जे आजतागायत कुणीही मोडू शकलेले नाहीत:

1. वनडे इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी

सचिन तेंडुलकरसोबतची गांगुलीची जोडी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध होती. या दोघांनी एकत्र 176 डावांत 8227 धावा केल्या. ही भागीदारी वनडे क्रिकेटमधील कोणत्याही जोडीपेक्षा सर्वाधिक आहे. आजपर्यंत कुठल्याही जोडीने 6000 धावांचा टप्पाही गाठलेला नाही.

2. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

वर्ष 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गांगुलीने 117 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ही खेळी आजही या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

3. डावखुऱ्या भारतीय फलंदाजाकडून सर्वोच्च कसोटी धावसंख्या

पाकिस्तानविरुद्ध 2007 साली कोलकातामध्ये खेळताना गांगुलीने 269 धावा केल्या. ही खेळी आजपर्यंत कोणत्याही डावखुऱ्या भारतीय फलंदाजाने केलेली सर्वाधिक कसोटी धावसंख्या आहे.

4. सलग चार वनडे सामन्यांत ‘प्लेयर ऑफ द मॅच’

1997 मध्ये गांगुलीने सलग चार वनडे सामन्यांत ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावले. ही कामगिरी आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अभूतपूर्व मानली जाते.

5. विश्वचषक स्पर्धेत भारतीय फलंदाजाकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

1999 च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध गांगुलीने 183 धावांची खेळी केली होती. ही खेळी अजूनही भारतीय फलंदाजाकडून वर्ल्ड कपमध्ये करण्यात आलेली सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सौरव गांगुलीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ‘दादा’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या गांगुलीने संघाला केवळ विजयी मार्गच दाखवला नाही, तर नव्या पिढीला आत्मविश्वासाने खेळण्याची शिकवणही दिली.

Comments are closed.