भूस्खलनामुळे केदारनाथ तीर्थक्षेत्र बंद

मुंकटिया येथे रस्त्यावर दरड कोसळली : भाविकांना सोनप्रयागमध्ये थांबवले

वृत्तसंस्था/ रुद्रप्रयाग

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. बद्रीनाथ आणि केदारनाथ महामार्गावर विविध ठिकाणी भूस्खलन होत आहे. केदारनाथ महामार्गावरील मुंकटिया येथे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड पडल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. केदारनाथ धामला जाणाऱ्या भाविकांना सोनप्रयाग येथे थांबवण्यात आले आहे.

सिरोबागड येथे बद्रीनाथ महामार्ग बंद आहे. जेसीबीच्या साहाय्याने माती बाजूला करून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, वाहतुकीला धोका कायम आहे. रविवारी रात्रीपासून उत्तराखंडच्या डोंगराळ जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अलकनंदा आणि मंदाकिनी नद्या भयानक पद्धतीने वाहत आहेत. पाऊस असाच सुरू राहिला तर समस्या वाढू शकतात. हवामान खात्याने दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भूस्खलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे केदारनाथ धामसह रुद्रप्रयाग जिह्यातील परिस्थितीही विदारक आहे.  रुद्रप्रयागमधील संगमस्थळाचा खालचा भागही पाण्याखाली गेला आहे. सतत भूस्खलन होत असल्याने प्रवासी विविध ठिकाणी अडकत आहेत. टेकडीवरून मोठे दगड आणि ढिगारा खाली येत आहेत. ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

शेकडो वाहने अडकली

सिरोबागडमध्येही बद्रीनाथ महामार्ग धोकादायक आहे. येथेही वरच्या टेकडीवरून भूस्खलन सुरू आहे. गेल्या तीन दशकांपासून सिरोबागडचा डोंगर चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी आणि पावसाळ्यात रुद्रप्रयाग आणि चमोली येथील लोकांसाठी डोकेदुखी बनतो. हा महामार्ग बंद असल्याने दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकली आहेत. या वाहनांमधील लोक महामार्ग सुरू होण्याची वाट पाहत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मशीन महामार्गावरून ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत.

Comments are closed.