कल्याणमध्ये भरचौकात व्हॅन उभी करून पोलिसांची ट्रॅफिकजाम ‘चाय पार्टी

कल्याणच्या चक्की नाका चौकात व्हॅन उभी करून पोलिसांनी ट्रॅफिकजाम चायपार्टी सुरू केल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी वाहतूक पोलिसांना प्रश्न करीत येथून जा, गाडी काढा असे सांगताच गाडी तुमच्या घराजवळ लावू का, असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान पोलिसांच्या या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कल्याण चक्की नाका परिसरात वाहतूक पोलि सांच्या हलगर्जी व बेजबाबदार वागणुकीचा नमुना पाहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सुमारास वाहतूक पोलीस चहा पिण्यासाठी चक्की नाका येथे आले होते. भररस्त्यात त्यांनी व्हॅन उभी करून टपरीवर जाऊन चहाचा आस्वाद घेत होते. या व्हॅनमुळे रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. नेवाळीकडून येणाऱ्या वाहनचालकांना उजवीकडे वळण घेणे कठीण झाले होते. पोलिसांच्या व्हॅनमुळे संपूर्ण चौकात वाहतूककोंडी झाली. त्यावेळी वाहनचाल कांनी पोलिसांना गाडी बाजूला करण्याची विनंती केली असता त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने गाडी तुमच्या घराजवळ लावू का, असे उद्धटपणे उत्तर दिले.
कारवाई का नाही?
एकीकडे कायद्याचे, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जाते तर दुसरीकडे कल्याणमधील पोलिसांकडूनच नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने कल्याणमधील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. सामान्य माणसाने रस्त्यावर गाडी उभी केली की तत्काळ दंड ठोठावला जातो. मात्र नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कारवाई का नाही, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
Comments are closed.