आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, अपघातात हॉटेल व्यावसायिक तरुणाचा मृत्यू

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा येथे सोमवारी रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातावेळी सुरेश धस यांचा मुलगा सागर धस हा कार चालवत होता. याप्रकरणी नितिनचा भाऊ स्वप्निल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुपा पोलीस ठाण्यात सागर धसविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर धसला ताब्यात घेतले आहे.
नितीन प्रकाश शेळके (34) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत नितीन शेळके हा आपल्या दुचाकीवरून जातेगाव फाटा येथून पळवे येथील घरी चालला होता. यावेळी महामार्गावर यू-टर्न मारत असताना नगरकडून पुण्याकडे भरधाव वेगात आलेल्या कारने नितिनच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात नितिन गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला उपचारासाठी सुपा येथील रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ दिवटे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारसह सागर धस आणि त्यांच्या मित्राला त्याब्यात घेतले. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मयत नितीन शेळके याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत शेळकेवर पळवे येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत नितीन शेळके याच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुले, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. नितीन शेळके याचा ज्या ठिकाणी अपघात झाला तेथेच वर्षापूर्वी त्याचे वडील आणि चुलत्यांचाही अपघाती मृत्यू झाल्याचे कळते.
Comments are closed.