एजबेस्टनमध्ये जिंकल्यानंतरही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार? ‘हा’ खेळाडू संघाबाहेर जाण्याची शक्यता

टीम इंडियाने (Team india) एजबेस्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 336 धावांनी दणदणीत विजय मिळवत जोरदार पलटवार केला. 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. मालिकेतील तिसरा सामना 10 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

जरी भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला असला, तरी लॉर्ड्समधील तिसऱ्या सामन्यात एक बदल होण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची (Prasiddh Krishna) कामगिरी काहीशी निराशाजनक राहिली. पहिल्या डावात त्याने 13 षटकांत 72 धावा दिल्या, तर दुसऱ्या डावात त्याला फक्त एकच विकेट मिळाली आणि त्याने 39 धावा दिल्या. कसोटी क्रिकेटमध्ये किमान 500 चेंडू टाकलेल्या गोलंदाजांमध्ये कृष्णाची इकॉनॉमी सर्वाधिक आहे. त्यामुळे आता भारतीय संघ व्यवस्थापन त्याला संघाबाहेर ठेवू शकते.

दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वर्कलोड मॅनेजमेंटमुळे खेळला नव्हता. पण तिसऱ्या कसोटी सामन्यात तो उपलब्ध असेल, अशी शक्यता आहे. जर बुमराह संघात परतला, तर प्रसिद्ध कृष्णाची जागा घेऊ शकतो.

दुसऱ्या सामन्यात बुमराहऐवजी आकाशदीपला (Aakash Deep) संघात संधी देण्यात आली होती आणि त्याने ती दोन्ही डावांत मिळालेल्या 10 विकेट्ससह जबरदस्त कामगिरी करत पूर्णपणे स्वतःला सिद्ध केले. त्यामुळे आता त्याला बाहेर ठेवणे कठीण आहे.

सर्व परिस्थिती पाहता, लॉर्ड्सच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna) संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्या जागी जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होऊ शकते. याशिवाय आणखी कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. तसेच सरावादरम्यान एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तरच काही बदल होईल.

Comments are closed.