निमिशा प्रियाच्या समस्या वाढतात
सहकाऱ्याच्या कुटुंबियांचा भरपाई घेण्यास नकार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मूळची भारतीय वंशाची नर्स निमिषा प्रिया हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिला तिच्या सहकाऱ्याच्या हत्येच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा येमेन या देशात ठोठावण्यात आली आहे. येमेनच्या शरियत कायद्यानुसार हत्या झालेल्याच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई देऊन मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून सुटका करुन घेता येते. तथापि, यासाठी हत्या झालेल्याच्या कुटुंबियांची मान्यता आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात तिला पैसे घेऊन क्षमा देण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे. निमिषा प्रिया ही नर्स म्हणून नोकरी करण्यासाठी येमेन या देशात गेली होती.
तिने तेथे स्वत:चे रुग्णालय स्थापन केले. तिचा सहकारी तलत अब्दो महदी याच्याशी तिचे मतभेद झाले. महदी याने तिचा पासपोर्ट ताब्यात घेतला. त्यामुळे तिचा भारतात परत येण्याचा मार्ग बंद झाला. तसेच महदी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असाही तिचा आरोप आहे. तिने आपला पासपोर्ट परत मिळविण्यासाठी महदी याला गुंगीचे इन्जेक्शन दिले. पण गुंगीचे औषध अधिक प्रमाणात दिले गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर मानवहत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. निमिषा प्रिया हिने आरोप नाकारले होते. तथापि, तिला मृत्यूदंडाची शित्रा ठोठावण्यात आली आहे. तिला जीवनदान मिळवून देण्याचा प्रयत्न भारत सरकारकडूनही केला जात आहे. आर्थिक भरपाई देऊन (ब्लड मनी) तिला मृत्यूदंडापासून वाचविण्याचा प्रयत्न तिच्या कुटुंबियांकडून केला जात आहे.
भरपाई घेण्यास नकार
महदी याच्या कुटुंबियांनी निमिषा प्रिया हिच्या कुटुंबियांकडून भरपाई घेण्यास, तसेच तिला क्षमा देण्यास नकार दिल्याने तिला मृत्यूदंड दिला जाणार हे निश्चित मानले जात आहे. हे प्रकरण भारताच्या सर्वोच्च न्यायालयातही पोहचले आहे न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस काढून त्याचे मत विचारले होते. आर्थिक भरपाई देणे हा एकच उपाय आता तिचा जीव वाचविण्यासाठी उरला आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केले होते.
कुटुंबियांना अधिकार
पैसे घेऊन जीवनदान द्यायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचा आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. त्यामुळे कुटुंबियांनी हत्येच्या बदल्यात हत्या या नियमाचा उपयोग करण्याचे ठरविले, तर मात्र निमिषा प्रिया हिचा जीव वाचविण्याचा उरला सुरला मार्गही बंद होणार आहे. सध्या येमेन प्रशासनाने तिला गुरुवारी दिला जाणार असलेला मृत्यूदंड पुढच्या आदेशापर्यंत पुढे ढकलला आहे. केंद्र सरकार आणि येमेनमधील भारतीय दुतावासाकडून अद्यापही तिच्या सुटकेसाठी प्रयत्न केला जात आहे. महदी याच्या कुटुंबियांना भरपाई घेण्यास राजी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती देण्यात आली. या प्रकरणात पुढे नेमके काय होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. येत्या आठवड्याभरात या संबंधातील स्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.