मँचेस्टर जिंकण्यासाठी बुमराला खेळवणार, चौथ्या कसोटीत हिंदुस्थानी संघ पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला पाचपैकी तीन कसोटींतच खेळवणार असल्याची आकाशवाणी गौतम गंभीर आणि संघव्यवस्थापनाने दौऱयापूर्वीच दिली होती. आता लॉर्ड्स पराभवामुळे गंभीर स्थितीत असलेल्या हिंदुस्थानी संघाला मँचेस्टरमध्ये मालिकेत बरोबरी साधता यावी म्हणून बुमराला खेळविण्याची तयारी केली जात आहे. एजबॅस्टन कसोटीतही बुमराच्या खेळण्याचा सस्पेन्स संघव्यवस्थापनाने टॉस उडवेपर्यंत कायम राखला होता. मात्र इंग्लंड सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असल्यामुळे 23 जुलैपासून सुरू होणाऱया मँचेस्टर कसोटीत मालिकेला निर्णायक वळण देता यावा म्हणून संघ बुमरासह खेळण्याची मानसिकता करतोय.
हिंदुस्थानला ज्या दोन्ही कसोटींत पराभवाचा धक्का बसला त्यात बुमराची कामगिरी भन्नाट होती. याचाच अर्थ तो असताना हिंदुस्थानचे उर्वरित गोलंदाज कमकुवत ठरत आहेत. बेकनहॅम येथे झालेल्या सरावसत्रानंतर मँचेस्टरला बुमराला खेळविण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र त्याचा अंतिम निर्णय मँचेस्टरमध्येच घेतला जाणार आहे. बुमराला केवळ तीनच कसोटी खेळविणार असल्याचे आधीच ठरलेय. त्यामुळे मँचेस्टरला बुमरा खेळला तर तो पाचव्या कसोटीत संघात नसेल.
मग त्याची संघाला गरज असो वा नसो. हा निर्णय संघव्यवस्थापनाने आधीच घेतल्याचे बोलले जात आहे. केवळ दोन कसोटी खेळलेल्या बुमराने दोनदा डावात पाच विकेट घेत 21 धावांच्या सरासरीने 12 विकेट घेतल्या आहेत. सिराजने तिन्ही कसोटी खेळत 13 विकेट टिपल्या आहेत.
खेळायला पंत, पण यष्टिरक्षणाचं काय?
ऋषभ पंत लॉर्ड्स कसोटीत बोटाला दुखापत होऊनही फलंदाजीला उतरला. मँचेस्टरलाही तो खेळणार आहे, पण त्याच्या यष्टिरक्षणाचे काय हा प्रश्न कायम आहे. तो अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही. लॉर्ड्स कसोटीत पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलने यष्टिरक्षण केले, पण त्याच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत. त्यामुळे मँचेस्टरला पंतला फक्त फलंदाजी आणि जुरेलला यष्टिरक्षण करताना पाहता येऊ शकते.
बुमराच्या जोडीला सिराज असणार
मोहम्मद सिराजने मालिकेत सर्वाधिक 13 विकेट टिपलेत. चौथ्या कसोटीतही तो संघात असणार, हे निश्चित आहे. गेल्या तिन्ही कसोटींत त्याने 109 षटके गोलंदाजी केली असून त्याच्यावरही गोलंदाजीचा अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे जसे बुमरावरचा ताण कमी केला जातोय, तसाच विचार सिराजबद्दलही केला जाणार आहे का?
Comments are closed.