स्वच्छता अभियानात कराड देशात दुसरे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
स्वच्छतेच्या अभियानात सातत्याने उच्च दर्जाची कामगिरी बजावणाऱया कराड नगरपालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये देशात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 50 हजार ते 3 लाख लोकसंख्या गटात कराडने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी (दि.17) पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अभियंता संदीप रणदिवे, शहर समन्वयक आशीष रोकडे, कर्मचारी प्रतिनिधी फैयाज बारगीर, शेखर लाड, किरण कांबळे, अशोक डाईगडे, संजय चावरे, स्वप्नील सरगडे उपस्थित होते.
या सातत्यपूर्ण यशामुळे कराड शहराची देशपातळीवर मान उंचावली असून, नगरपालिकेच्या योजनाबद्ध प्रयत्नांना आणि नागरिकांच्या सहकार्याला मिळालेली ही मोठी पोचपावती आहे.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेस पुरस्कार
अहिल्यानगर जिह्यामधील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली प्रवरा नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ सुपर लीग अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री मनोहरलाल खट्टर, महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन 2021 ते मार्च 2025 वर्षाअखेरपर्यंत उत्कृष्ट कामगिरीबाबत नगरपरिषदेस हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, आरोग्य निरीक्षक ,कृष्णा महांकाळ यांनी स्वीकारला.
यावेळी शहर समन्वयक उदय इंगळे उपस्थित होते. हा पुरस्कार देवळाली प्रवरा शहरवासीय, सर्व अधिकारी-कर्मचारी व विशेषतः सफाई कर्मचारी यांच्या योगदानामुळे मिळाला असून, त्यांनाच समर्पित असल्याची भावना मुख्याधिकारी पाटील यांनी व्यक्त केली.
स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये कराड नगरपरिषदेला देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळालेला आहे. या यशाचे श्रेय नगरपरिषदेचे सर्व आरोग्य कर्मचारी पदाधिकारी व विभागप्रमुख यांचे आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हे यश संपादित करता आहे. आरोग्य कर्मचाऱयांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे कराड नगरपरिषदेने हा गौरव मिळवलेला आहे. नागरिकांनी यापुढेही असेच सहकार्य करावे, पुढील वर्षीही असेच यश संपादन करू.
– प्रशांत व्हटकर, मुख्याधिकारी, कराड नगरपालिका.
Comments are closed.