मॅंचेस्टर कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये हनुमान चालीसा; खेळाडूंनी घेतली नवी ऊर्जा!
लॉर्ड्समध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघ मॅंचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी नव्या जोमाने सरावात व्यस्त झाला आहे. या सामन्याआधी संघ केंट काउंटी क्रिकेट ग्राउंड, बेकेनहम येथे सरावासाठी पोहोचला. लंडनहून सुमारे एक तासाच्या बस प्रवासानंतर खेळाडूंनी शांत आणि सकारात्मक वातावरणात सराव केला.
संघाचा मूड हलका आणि उर्जावान ठेवण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये हनुमान चालीसा, इंग्लिश पॉप आणि पंजाबी गाण्यांची मेजवानी होती. काही खेळाडू ध्यानमग्न होऊन हनुमान चालीसा ऐकत होते, तर काहीजण पंजाबी ठेक्यावर डोलताना दिसले.
रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह सरावासाठी मैदानात आले असले तरी त्यांनी केवळ वॉर्म-अप आणि जिम सत्रात भाग घेतला. पंतला बोटाला दुखापत असून, मात्र तो पुढील मॅंचेस्टर कसोटीपूर्वी बरा होईल अशी अपेक्षा आहे. पत्रकारांशी संवाद साधताना पंत म्हणाला, “काही ऐकूच येत नाहीय,” कारण गाणी जोरात वाजत होती. त्यावर बुमराहने चटकन जोक मारला, “आज दुग्गलजी बहिरे झालेत,” – हा एक प्रसिद्ध हिंदी सिनेमातील डायलॉग असून सर्व पत्रकार हसू लागले.
अर्शदीप सिंगला सरावादरम्यान डाव्या हाताला दुखापत झाली असून, त्याच्या हातावर पट्टी बांधलेली दिसून आली. त्यामुळे तो नेटमध्ये फलंदाजीसाठी उतरू शकला नाही. केएल राहुल वगळता संघातील बहुतांश खेळाडूंनी सरावात सहभाग घेतला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजी न करता फक्त फिटनेस सत्रात भाग घेतला. हे संघ व्यवस्थापनाचे धोरणात्मक पाऊल होते, जेणेकरून दोघांवर अतिरिक्त ताण येणार नाही.
सरावादरम्यान जेव्हा फलंदाजी कोच सितांशु कोटक अर्शदीपला शोधत होते, तेव्हा कर्णधार शुबमन गिलने स्पष्ट केलं की अर्शदीपच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो सराव करू शकणार नाही.
मॅंचेस्टर कसोटी सामन्यासाठी संघ सज्ज होत असला तरी खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनासाठी हा एक मोठा विचाराचा विषय बनला आहे. आगामी सामन्यात कोणाला विश्रांती दिली जाईल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण अजूनही ही मालिका निर्णायक वळणावर आहे.
Comments are closed.