शारीरिक संबंधास नकार देणे, पतीला इतरांसमोर अपमानित करणे हा छळच; हायकोर्टाचा निर्वाळा

पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे, तसेच खोटे आरोप करत पतीचा मित्रांसमोर अपमान करणे हा पत्नीने केलेला छळच आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणात दिला. यातून क्रूरता सिद्ध होत असल्याचे म्हणत घटस्फोटाच्या आदेशाला आव्हान देणारे महिलेचे अपिल न्यायालयाने फेटाळले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

पुण्यातील कुटुंब न्यायालयाने क्रूरतेच्या आधारे पतीला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट मंजूर केला होता. कुटुंब न्यायालयाच्या या आदेशाला महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच वैवाहिक हक्क परत मिळवून देण्याची विनंती केली होती. या अपिलावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठानसमोर सुनावणी झाली.

यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने पत्नीनेच पतीचा छळ केल्याच्या वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब केले. पत्नीने पतीचा त्याच्या मित्रांसमोर अपमान करणे आणि त्याच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे हा पतीला मानसिक त्रास देण्याचाच प्रकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे ही देखील पत्नीने पतीसोबत केलेली क्रूरता असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

पुण्यातील दाम्पत्याचे 12 डिसेंबर 2013 रोजी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर एका वर्षातच दोघांमध्ये मतभेद झाले. यानंतर 14 डिसेंबर 2014 रोजी ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. एप्रिल 2015 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. परंतु, जुलै 2015 मध्ये आपल्याला जबरदस्तीने याचिका दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप करत पत्नीने पती व त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर क्रूरतेच्या कारणावरुन पुण्यातील कुटुंब न्यायालयाने 28 नोव्हेंबर 2019 रोजी पतीला घटस्फोट मंजूर केला होता.

Comments are closed.