Ratnagiri News – कोकण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव, विनायक राऊत यांचा आरोप

कोकण किनारपट्टी आणि महामार्गाच्या आजूबाजूचे गाव सिडकोच्या ताब्यात देण्याचा डाव राज्य सरकारने आखला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यावेळी आवाज उठवत आंदोलन केल्यामुळे तो निर्णय राज्य सरकारला बासनात गुंडाळावा लागला होता. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्ती करून कोकणातील सुमारे साडे आठशे गावे त्यांच्या ताब्यात देण्याचा डाव राज्य सरकारने आखला आहे. उद्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लोकांच्या जमिनी आणि बागायती ताब्यात घेतील तेव्हा त्याविरोधात शेतकऱ्यांना आवाजही उठवता येणार नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना केला.
कोकणातील जमिनी आणि बागायती धनदांडग्याच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. पुढे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले की, आजकाल गुंडांचं राज्य झालेले आहे. मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी येऊन हाणामारी करत आहेत. हा महाराष्ट्र विधानभवनाला लागलेला कलंक आहे. आज राज्यात गुंडाचे मुख्यमंत्री आहेत. हे लुटारूंचे राज्य आहे. जनतेच्या करातून मिळालेला पैसा लुटण्याचे काम सुरू असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
वाटद एमआयडीसीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोध करणार असून उद्या होणाऱ्या जनआक्रोश सभेला शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे राऊत यांनी सांगितले. नाणार येथे ऑटोमोबाइल प्रकल्प येणार ही थापेबाजी असल्याचा आरोप त्यांनी केला.
Comments are closed.