IND vs ENG: मॅचेस्टरमध्ये बुमराह ईशांत शर्माचा मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत, इंग्लंडमध्ये नंबर 1 भारतीय गोलंदाज होण्याची संधी

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडच्या मैदानावर सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतही बुमराहची गोलंदाजी जादू पहायला मिळत आहे. आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या, तसेच फलंदाजी करताना देखील त्याने पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केला होता. आता प्रश्न असा आहे की, बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार का?

मालिकेच्या सुरुवातीला भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सांगितले होते की, बुमराह फक्त 3 कसोटी सामने खेळणार. सध्या त्याने दोन सामने खेळले आहेत. पण, मालिकेचे भवितव्य ठरवणारा सामना ओल्ड ट्रॅफर्डवर आहे, त्यामुळे बुमराह संघात समावेश होण्याची शक्यता खूप जास्त आहे. जर बुमराह चौथ्या कसोटीत खेळला आणि त्याने 3 विकेट्स घेतल्या, तर तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरेल.

सध्या इंग्लंडच्या मैदानावर भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ईशांत शर्माच्या (Ishaant Sharma) नावावर आहे. त्याने 51 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे, ज्याने आतापर्यंत 49 विकेट्स घेतल्या आहेत. जर बुमराहने अजून 3 विकेट्स घेतल्या, तर तो ईशांतचा विक्रम मोडेल. या यादीत कपिल देव (43 विकेट्स) तिसऱ्या, आणि मोहम्मद शमी (42 विकेट्स) चौथ्या स्थानावर आहेत.

बुमराह चौथ्या कसोटीत खेळेल की नाही, हा मोठा प्रश्न आहे. पण, टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डोशेट यांनी सूचकपणे सांगितले आहे की, बुमराह मैदानात उतरणार आहे, कारण ही मालिका निर्णायक टप्प्यात आली आहे. लॉर्ड्समध्ये मिळालेल्या पराभवानंतर भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत बुमराहला विश्रांती देणे म्हणजे मोठा धोका घेणे ठरेल आणि तो धोका टीम इंडिया घेणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Comments are closed.