IND vs ENG: मँचेस्टरमध्ये रिषभ पंतला बाहेर बसवा, शुबमन गिलला रवी शास्त्रींचा अनोखा सल्ला
शानदार फॉर्ममध्ये असलेला रिषभ पंत (Rishbh Pant) सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त प्रदर्शन करत आहे. लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यातच त्याने दोन शतके ठोकून चांगली कामगिरी केली आहे. तरीही, माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना असं वाटत आहे, की पंतला चौथ्या कसोटीत खेळवू नये.
लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे अनेक वेळा त्याच्याकडून यष्टिरक्षण करण्यात आलं नाही. त्याचबरोबर फलंदाजी करतानाही तो त्रासात दिसला.
त्यामुळे, शास्त्रींचं मत आहे की पंतला चौथ्या कसोटीत केवळ फलंदाज म्हणून देखील खेळवू नये. कारण जर तो यष्टिरक्षक म्हणून खेळत नसेल, तरी क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि त्यामुळे बोटाची दुखापत अजून वाढू शकते.
शास्त्री म्हणाले, जर तो कीपिंग करू शकत नसेल, तर फक्त फलंदाज म्हणून त्याला खेळवणं योग्य ठरणार नाही. कारण त्याला मग फील्डिंग करावी लागेल आणि त्या वेळी जर काही चेंडू हातावर जोरात लागला तर दुखापत अधिक गंभीर होऊ शकते.
ग्लोव्ह्ज असताना काहीशी सुरक्षितता असते, पण फील्डिंग करताना ती नसते. अशा वेळी जर बोटावर काही लागलं, तर ती दुखापत बिघडू शकते. आधी हे पाहणं महत्त्वाचं आहे की, हा फक्त ताण आहे की हाडाला तडा आहे. जर फ्रॅक्चर असेल, तर त्याला आराम दिला गेला पाहिजे आणि तो ओव्हल कसोटीसाठी पूर्ण तंदुरुस्त होऊनच परता यावा असं शास्त्री म्हणाले.
रिषभ पंत सध्या भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा फलंदाज ठरत आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत त्याने आतापर्यंत 6 डावांमध्ये 70.83 च्या सरासरीने 425 धावा केल्या आहेत. त्याच्या आक्रमक खेळामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी तो डोकेदुखी ठरत आहे.
Comments are closed.