टीम इंडियाला धक्क्यावर धक्के! नीतीश कुमार रेड्डी मालिकेतून बाहेर, जिममध्ये नेमकं काय घडलं?

नितीश कुमार रेड्डी यांनी इंग्लंडच्या कसोटी मालिकेबाहेर राज्य केले: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आधीच पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. मँचेस्टरमध्ये 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच्या अगोदर भारतीय संघावर दुखापतीचं ग्रहण लागले आहे. आधीच वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आकाश दीप हे दोघं दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत, आणि आता अष्टपैलू खेळाडू नीतीश कुमार रेड्डी देखील या यादीत सामील झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेड्डीला झालेल्या दुखापतीमुळे तो उर्वरित दोन्ही कसोटी सामने खेळू शकणार नाही.

नीतीश कुमार रेड्डी मालिकेतून बाहेर, जिममध्ये नेमकं काय घडलं?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये 23 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याआधी भारतीय संघ जोरदार सरावात व्यस्त होता. मात्र रविवारी, 20 जुलै रोजी जिममध्ये ट्रेनिंग दरम्यान रेड्डीच्या गुडघ्याला दुखापत झाली. तत्काळ स्कॅन केल्यानंतर लिगामेंट इन्ज्युरी असल्याचं समोर आलं. त्यामुळे रेड्डी या मालिकेतून बाहेर गेला आहे.

रेड्डीची ही दुखापत किती गंभीर आहे आणि तो किती काळासाठी मैदानाबाहेर राहील, याचा खुलासा आगामी काही दिवसांत होईल. सध्या तरी बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला रिप्लेसमेंट म्हणून पाठवले जाईल का, हेही अजून स्पष्ट झालेलं नाही.

इंग्लंडविरुद्ध नीतीश रेड्डीची कामगिरी

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार कसोटी पदार्पण करणाऱ्या नीतीशसाठी ही मालिका विशेष काही खास राहिली नाही. पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. मात्र दुसऱ्या कसोटीत शार्दूल ठाकूरच्या जागी त्याची निवड झाली होती. त्या सामन्यात त्याला दोन्ही डावांत मिळून केवळ 1-1 धाव करता आल्या आणि गोलंदाजीमध्येही यश मिळालं नाही. तरीही त्याच्यावर विश्वास ठेवून तिसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा संधी देण्यात आली, जिथे त्याने 3 विकेट्स घेतल्या आणि 30 व 13 धावांच्या उपयुक्त खेळी खेळल्या. मात्र मोठी खेळी साकारण्यात तो अपयशी ठरला.

टीम इंडियावर दुखापतीचं संकट

रेड्डीच्या दुखापतीमुळे आधीच अडचणीत असलेल्या भारतीय संघावर आणखी दबाव आला आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप (पाठीचा त्रास) आणि डावखुरा अर्शदीप सिंग (हातात जखम) यांचं चौथ्या कसोटीत खेळणं जवळपास अशक्य आहे. आकाश दीपने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत भाग घेतला होता, तर अर्शदीपने अजूनपर्यंत कसोटी पदार्पणही केलेलं नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे निवड समितीने युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याला संघात स्थान दिलं आहे.

रेड्डीच्या रिप्लेसमेंटबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसला, तरी संघाकडे अष्टपैलू पर्याय म्हणून शार्दूल ठाकूरचा पर्याय उपलब्ध आहे. टीम इंडियासाठी आगामी दोन कसोट्या निर्णायक असणार आहेत. अशा स्थितीत दुखापतींचं संकट गंभीर चिंता वाढवतंय, आणि प्रशिक्षक गौतम गंभीरसह संपूर्ण व्यवस्थापनासमोर मोठं आव्हान असणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.