नगरविकास खात्याने नवी मुंबईची वाट लावली, गणेश नाईकांचा मिंध्यांवर निशाणा

नगरविकास खात्याने नवी मुंबईची पुरती वाट लावली आहे. सामाजिक उपक्रमासाठी आरक्षित भूखंड स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांच्या घशात घातले. कोरोना काळात नवी मुंबईकरांच्या ऑक्सिजन आणि औषधांवरही डल्ला मारण्यात आला, अशा आरोपांच्या फैरी झाडत वन मंत्री गणेश नाईक यांनी आज शहा सेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ही दरोडेखोरी थांबली नाही तर आगामी महापालिका निवडणूक पाणीचोर, ऑक्सिजनचोर, औषधचोर आणि भूखंडचोर या मुद्द्यांवरच लढवणार, असा इशारा गणेश नाईक यांनी एकनाथ मिंधेंना दिला.

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत मिंधे-भाजप वाद विकोपाला गेल्याने दोन्ही बाजूच्या इच्छुकांचा बीपी वाढू लागला आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिका अधिकारी आणि माजी नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नगरविकास विभागाला टार्गेट केले.

बारवी धरणातील 40 एमएलडी पाणी हे नवी मुंबईकरांच्या हक्काचे आहे. मात्र गेल्या साडेपाच वर्षांपासून नवी मुंबईकरांचे हे पाणी परस्पर दुसरीकडे वळवण्यात आले आहे. एक तर नवी मुंबईचे पाणी चोरायचे आणि दुसरीकडे नवी मुंबईत पाणीटंचाई आहे, अशी बोंबाबोंब करायची, असे उद्योग आता सुरू करण्यात आले आहेत. मात्र नवी मुंबईकरांच्या पाण्यावर दरोडा टाकणाऱ्यांना येत्या महापालिका निवडणुकीत जनता चांगला धडा शिकवणार आहे, असा विश्वासही गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

मिंधे पुत्राने नवी मुंबईकरांच्या हक्काचे बारवी धरणातील पाणी कल्याण आणि डोंबिवलीत वळवले आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप करत गणेश नाईक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले.

निवडणुकीनंतर ती 14 गावे वगळणार

कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेवर सुमारे साडेसहा हजार कोटींचा भुर्दंड पडणार आहे. निवडणुकीपुरती ही गावे नवी मुंबईत राहणार आहेत. निवडणूक झाल्यानंतर मात्र ही 14 गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्यात येणार आहेत, असेही नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments are closed.