मुंबईत एका दिवसात अडीच लाख किलो चिकन-मटण फस्त, गटारीचा झणझणीत बेत

येत्या शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शेवटच्या रविवारचा मुहूर्त साधत मुंबईकरांनी ‘फुल्ल टू गटारी’ साजरी केली. सकाळपासून चिकन, मटणाच्या दुकानांबाहेर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. मालाड, ससून डॉक या मासळी बाजारात पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. घरोघरी नॉनव्हेजचा चमचमीत आणि झणझणीत बेत होता. रविवारी दिवसभरात मुंबईकरांनी तब्बल दोन ते अडीच लाख किलो मटण-चिकन फस्त केले.

श्रावण महिन्यात मांसाहार करायचा नसल्यामुळे पुढच्या महिनाभराची कसर भरून काढण्यासाठी मुंबईकरांनी रविवारी नॉनव्हेजवर ताव मारला. पापलेट, कोळंबी, सुरमई अशा माशांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे खवय्यांनी चिकन-मटणाकडे आपला मोर्चा वळवला. वाढती मागणी लक्षात घेता चिकन-मटण विव्रेत्यांनी आधीच कोंबडी-बोकडांची तजवीज केली होती. एरव्ही रविवारीदेखील चिकन-मटणाच्या दुकानाबाहेर रांगा असतात. मात्र जिथे दहा मिनिटांचा वेळ लागायचा तिथे ग्राहक तासभर वेटिंगवर होते. गटारी आणि मद्य हे एक वेगळेच समीकरण असते. तळीरामांचे घसे ओले करण्यासाठी बिअर बार, वाईन शॉप सज्ज होते.

ऑनलाईन ऑर्डर जोरात

रांगेच्या कटकटीपासून सुटका व्हावी यासाठी अनेकांनी आधीच हॉटेलमध्ये ग्रुप बुकिंग करून ठेवले होते. काही हॉटेलांत फीश थाळीवर कुरकुरीत मांदेली किंवा जवळा फ्री यासारख्या स्पेशल ऑफर ठेवल्या होत्या. काहींनी हॉटेलातील गर्दी टाळण्यासाठी स्विगी, झोमॅटोवरून ऑर्डर करणे पसंत केले. चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, लॉलीपॉप, ट्रिपल राईसला ऑनलाईन सर्वाधिक मागणी होती. आगरी पद्धतीचे जेवण देणाऱ्या खानावळींकडेही मोठ्या प्रमाणात ऑर्डर आल्या होत्या.

रिसॉर्ट हाऊसफुल्ल

मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत गटारी साजरी करता यावी यासाठी अनेकांनी आधीच हॉटेल, रिसॉर्ट बुक केले होते. वन डे पिकनिकसाठी मढ, मनोरी, आक्सा, गोराई, वसई परिसरातील रिसॉर्टला सर्वाधिक पसंती होती. ग्राहकांच्या मागणीमुळे रिसॉर्ट मालक अव्वाच्या सव्वा दर आकारत होते.

तळीरामांसाठी पोलीस बंदोबस्त

मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात ठेवला होता.

Comments are closed.