व्लादिमीर पुतीन भारत भेट देण्यासाठी

अमेरिका, नाटोचा आक्षेप : अनेक महत्त्वाच्या घोषणा होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढता जागतिक तणाव आणि अमेरिका-नाटोच्या तीव्र आक्षेपानंतरही रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे चालू वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेकरता होणार असून ती 2021 नंतर पहिल्यांदाच नवी दिल्लीत आयोजित होणार आहे.  अमेरिका आणि नाटोकडून रशियावर सातत्याने निर्बंध लादले जात असताना दौऱ्यासंबंधी ही माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि नाटोकडून भारतावर रशियन कच्च्या तेलाची खरेदी थांबविण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत संरक्षण उद्योगात सहकार्य, ऊर्जा क्षेत्रात भागीदारी, आण्विक ऊर्जा सहकार्य, आर्क्टिक क्षेत्रात भारताच्या भूमिकेचा विस्तार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्त रोडमॅपवर काम यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विनंतीनुसार रशियाने भारतासाठी खतनिर्यात वाढविली असून यामुळे भारतीय अन्नसुरक्षेला बळ मिळाल्याचा खुलासा अलिकडेच पुतीन यांनी केला आहे. तर भारत आणि रशियादरम्यान नव्या आण्विक संयत्राच्या दुसऱ्या स्थानाला अंतिम स्वरुप देण्याची प्रक्रियाही शिखर परिषदेदरम्यान पूर्ण होऊ शकते.

अमेरिका, नाटोच्या भूमिकेकडे लक्ष

रशियाच्या विरोधात पाश्चिमात्य निर्बंधांनंतरही भारताने रशियाकडुन कच्च्या तेलाची खरेदी आणि संरक्षण भागीदारी जारी ठेवली आहे. भारताने रशियापासून अंतर राखावे आणि खासकरुन उच्च तंत्रज्ञान आणि सैन्य विषयक व्यवहार करू नयेत अशी अमेरिकेची इच्छा आहे. तर भारताची भूमिका जी7 आणि पाश्चिमात्य  जगताच्या रणनीतिला कमकुवत करणारी असल्याचे नाटोचे मानणे आहे. तर भारत स्वत:चे विदेश धोरण स्वतंत्र स्वरुपात निश्चित करतो, रशिया एक जुना आणि विश्वासार्ह सहकारी असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.