डिजिटल पेमेंट्समध्ये भारताचे स्टॅन
जगात पहिल्या क्रमांकावर : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही केले कौतुक
नवी दिल्ली
जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट क्षेत्रात भारताने जगात पहिले स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालानुसार, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसमुळे (युपीआय) भारताने डिजिटल व्यवहारांमध्ये हे स्थान मिळवले आहे. डिजिटल व्यवहार क्षेत्रातील भारताच्या या कामगिरीचे ‘आयएमएफ’ने कौतुक केले आहे. भारतातील सर्व डिजिटल पेमेंटपैकी 85 टक्के ‘युपीआय’चा वाटा आहे. त्याचवेळी, जगातील सर्व रिअल-टाइम डिजिटल पेमेंटपैकी निम्म्याहून अधिक पेमेंट भारताच्या ‘युपीआय’द्वारे केले जाते, असे आयएमएफने जाहीर केले आहे.
भारताने डिजिटल पेमेंटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नवीन अहवालानुसार भारत जगात रिअल टाइम पेमेंटमध्ये जागतिक आघाडीवर आहे. जून 2025 मध्ये युपीआयच्या माध्यमातून 1,839 कोटी व्यवहारांद्वारे 24.03 लाख कोटी रुपयांचे विक्रमी संकलन झाले. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या जूनपेक्षा 32 टक्क्यांनी अधिक आहे.
‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (एनपीसीआय) 2016 मध्ये लाँच केलेले ‘युपीआय’ आज देशात पैसे व्यवहार करण्याचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग बनला आहे. युपीआयच्या मदतीने लोक त्यांचे कोणतेही बँक खाते एकाच मोबाईल अॅपशी लिंक करून काही सेकंदात सुरक्षित व खात्रीशीर व्यवहार करू शकतात. ‘एनपीसीआय’च्या माहितीनुसार, ‘युपीआय’द्वारे दरमहा 1,800 कोटींहून अधिक व्यवहार होतात. तसेच दररोज सरासरी 60 कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद होताना दिसते.
85 टक्के डिजिटल पेमेंट ‘युपीआय’द्वारे
सध्या भारतात 85 टक्के डिजिटल पेमेंट ‘युपीआय’द्वारे केले जात आहेत. या अंतर्गत 49.1 कोटी वापरकर्ते, 6.5 कोटी व्यापारी आणि 675 बँका एकाच प्लॅटफॉर्मवर जोडल्या गेल्या आहेत. इतकेच नाही तर, युपीआय आता जागतिक स्तरावर सुमारे निम्म्याहून अधिक रिअल-टाइम डिजिटल पेमेंट हाताळत आहे. या सेवेमध्ये कोणतीही व्यक्ती बँकेच्या नावाची चिंता न करता कोणत्याही बँकेतून कोणालाही पेमेंट करू शकते. युपीआयने भारताला रोख आणि एटीएम कार्ड आधारित पेमेंटपासून दूर करून डिजिटल-प्रधान अर्थव्यवस्थेकडे नेले आहे. आर्थिक व्यवहारांसाठीचा हा प्लॅटफॉर्म केवळ मोठ्या व्यवसायांसाठीच नाही तर लहान दुकानदार आणि सामान्य लोकांसाठी देखील पैशांच्या देव-घेवीसाठीचा एक मजबूत मार्ग बनला आहे.
भारताबाहेरही युपीआयचा वापर
युपीआयचा प्रभाव आता भारताच्या सीमेबाहेरही दिसून येत आहे. सध्या ते संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस या सात देशांमध्ये उपलब्ध आहे. फ्रान्समध्ये युपीआय लाँच केल्याने युरोपमध्ये भारताच्या डिजिटल व्यवहारांचे पहिले पाऊल पडले आहे. या सुविधेमुळे परदेशात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीयांना पेमेंट करणे सोपे झाले आहे. भारताला नजिकच्या काळात ‘ब्रिक्स’ देशांनाही या सामान्य डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये सामावून घ्यायचे आहे. ब्रिक्स देशांमध्ये ही सुविधा मिळाल्यास भारताचे डिजिटल नेतृत्व आणखी मजबूत होणार आहे.
Comments are closed.