पुणे ग्रँड चॅलेंज टूर – आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत 40 हिंदुस्थानी खेळाडूंना संधी

पुढील वर्षी जानेवारीमध्ये ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेत यजमान या नात्याने 40 हिंदुस्थानी सायकलपटूंना संधी देण्यात येणार असून यात महाराष्ट्रातील 10 खेळाडूंचा सामवेश असेल.
हिंदुस्थानात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतीने तयारीला लागावे, असे निर्देश उपमुखमंत्री अजित पवार यांनी दिले. या स्पर्धेमुळे पुणे शहर व जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पटलावर येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेच्या अनुषंगाने आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलपुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त शीतल तेली उगले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवड शहर सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीएफआय) महासचिव मनिंदर पाल सिंग आदी उपस्थित होते. अजित पवार पुढे म्हणाले, ‘या स्पर्धेसाठी आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती, मार्गाची स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आदी बाबींवर लक्ष द्यावे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घ्यावा. केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळोवेळी सादर करावी. त्यानुसार आवश्यक तेथे त्रुटींची दुरुस्ती करता येईल.’
पुणे शहर व पिंपरी–चिंचवड, मावळ मुळशी, पिंपरी-चिंचवड, भोर, वेल्हे, मुळशी, पुणे शहर, पुरंदर आणि बारामती अशी चार टप्प्यांत ही स्पर्धा होणार आहे. ‘स्पर्धेची मोठी पूर्वप्रसिद्धी आणि स्पर्धेदरम्यानही 25 देशांत थेट प्रक्षेपण व्हावे असा प्रयत्न आहे. पुणे जिह्यातील पर्यटन संस्कृती आणि क्रीडा संस्कृतीला या स्पर्धेमुळे चालना मिळणार आहे. या स्पर्धेत सुमारे 50 देशांचे खेळाडू सहभागी व्हावेत असा प्रयत्न सुरू आहे,’ अशी माहिती सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीएफआय) महासचिव मनिंदर पाल सिंग यांनी दिली. ‘ही सायकल स्पर्धा पाहून प्रेरणा मिळालेल्या नवोदित सायकलपटूंना सराव करता यावा यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे वेलोड्रम उभारण्यासाठी 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव केला असल्याचे राज्याच्या क्रीडा आयुक्त शीतल तेली–उगले यांनी सांगितले. यावर या प्रस्तावाला तत्काळ निधी देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
Comments are closed.