टीम इंडियाला धक्क्यावर धक्के! नीतीश रेड्डी, अर्शदीप सिंग दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट! चौथ्या कसोटीसाठी अंशुल पंबोजचा संघात समावेश

अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेत पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी धक्क्यावर धक्के बसत आहेत. अष्टपैलू नीतीश कुमार रेड्डी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हे खेळाडू दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेतून आऊट झाले आहेत. रविवारी सरावसत्रादरम्यान नीतीशच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तर अर्शदीपला नेट प्रॅक्टिसदरम्यान डाव्या हाताच्या अंगठय़ाला इजा झाली. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून दोघांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. बॅकअप म्हणून हरयाणाच्या 24 वर्षीय अंशुल पंबोजचा हिंदुस्थानी संघात समावेश करण्यात आला आहे.

हिंदुस्थानी संघाला दुखापतीचे ग्रहण!

नीतीश कुमार रेड्डीच्या दुखापतीमुळे आधीच अडचणीत असलेल्या हिंदुस्थानी संघावर आणखी दबाव आला आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप (पाठीचा त्रास) आणि डावखुरा अर्शदीप सिंग (हाताला जखम) यांचं चौथ्या कसोटीत खेळणं जवळपास अशक्य आहे. आकाश दीपने दुसऱ्या आणि तिसऱया कसोटीत भाग घेतला होता, तर अर्शदीपने अजूनपर्यंत कसोटी पदार्पणही केलेलं नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे निवड समितीने युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याला संघात स्थान दिलं आहे. बीसीसीआयने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकात नीतीश कुमार रेड्डी संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्याची आणि अर्शदीप मँचेस्टरच्या चौथ्या कसोटीपासून बाहेर झाल्याची माहिती देण्यात आली. रेड्डीच्या रिप्लेसमेंटबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसला तरी टीम इंडियाकडे अष्टपैलू म्हणून शार्दूल ठाकूरचा पर्याय उपलब्ध आहे. टीम इंडियासाठी आगामी दोन कसोटी निर्णायक असणार आहेत. अशा स्थितीत दुखापतींचं संकट गंभीर चिंता वाढवतंय, आणि प्रशिक्षक गौतम गंभीरसह संपूर्ण व्यवस्थापनासमोर हे मोठं आव्हान असणार आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानी संघ सध्या 1-2 अशा पिछाडीवर आहे. 23 जुलैपासून ओल्ड ट्रफर्डवर सुरू होणाऱया चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा संघाचा प्रयत्न असेल. रविवारी हिंदुस्थानी क्रिकेट संघ मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबच्या खेळाडूंना भेटण्यासाठी ओल्ड ट्रफर्डला गेला होता. मात्र, केएल राहुल आणि नीतीश कुमार रेड्डी सहभागी झाले नव्हते. राहुल पूर्णपणे तंदुरुस्त असून, त्याच्या फिटनेसबाबत कोणतीही चिंता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूरला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत शार्दुलने नीतीशच्या जागी खेळत चांगली कामगिरी केली होती.

चौथ्या कसोटीसाठी हिंदुस्थानी संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार व यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज.

वेगवान गोलंदाज अंशुल पंबोजला पाचारण

‘टीम इंडिया’ला लागलेल्या या दुखापतीच्या ग्रहणामुळे अंशुल कंबोजला संघात पाचारण करण्यात आले आहे. अंशुलने इंग्लंड लायन्सविरुद्ध ‘इंडिया ए’ संघाकडून दोन सामन्यांमध्ये 5 बळी घेतले होते. लाहली (केरळ) येथे गतवर्षी रणजी करंडक सामन्यात एका डावात 10 बळी टिपत तो प्रसिद्धीझोतात आला होता. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात 10 बळी घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला.

Comments are closed.