भारतीय नेव्हीची शक्ती वाढेल

जीआरएसईकडून पाणबुडीविरोधी ‘अजय’ युद्धनौकेचे सादरीकरण

वृत्तसंस्था/ कोलकाता

समुद्रात शत्रूच्या उरात धडकी भरविण्यासाठी भारतीय नौदल सातत्याने स्वत:च्या सामर्थ्यात वाढ करत आहे. याचदरम्यान संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने (जीआरएसई) सोमवारी भारतीय नौदलासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या 8 पाणबुडीविरोधी युद्धनौकांपैकी अखेरची युद्धनौका ‘अजय’चे सादरीकरण केले आहे. ही युद्धनौका कोलकात्यात नौदलाचे चीफ ऑफ मटेरियल व्हाइस अॅडमिरल किरण देशमुख यांच्या पत्नी प्रिया देशमुख यांनी लाँच केली आहे.

‘अजय’ युद्धनौकेच्या सादरीकरणासह या प्रकल्पाच्या सर्व 8 युद्धनौकांची निर्मिती यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या 8 युद्धनौकांना खासकरून किनारी भागांमध्ये काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ही युद्धनौका तुलनेत कमी खोल भागात (शॅलो वॉटर)ही सहजपणे मोहीम राबवू शकते. याची लांबी 77.6 मीटर आणि रुंदी 10.5 मीटर आहे. ही युद्धनौका किनारी भागांमध्ये पाणबुड्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

शत्रूवर हल्ला करण्यासही सक्षम

या युद्धनौकांवर टॉरपीडो, एएसडब्ल्यू रॉकेट आणि माइन्स यासारखी घातक शस्त्रास्त्रs आहेत. याचबरोबर हे विमानांसोबत मिळून समन्वित पाणबुडीविरोधी मोहीम राबवू शकते. पृष्ठभागावरील शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्याची क्षमता देखील या युद्धनौकेत आहे. तसेच कमी त्रीवता असलेल्या सागरी मोहिमा आणि माइन्स पेरण्याच्या कामामध्येही हे उपयुक्त आहे.

स्वदेशी निर्मितीचे मोठे उदाहरण

जीआरएसईकडून पूर्णपणे भारतात डिझाइन आणि तयार करण्यात आलेल्या या युद्धनौकांची ही साखळी भारतीय नौदलाच्या सामर्थ्याला किनारी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढविणारी आहे.

Comments are closed.