उपाध्यक्ष धनखर यांचा राजीनामा

आरोग्याच्या समस्यांमुळे घेतला निर्णय : राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, खासदारांचे मानले आभार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या कारकिर्दीत राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि खासदारांचे सहकार्य आणि प्रेम लाभल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. भारताच्या प्रगतीचे साक्षीदार होणे ही आपल्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामापत्र पाठवले. आरोग्याला प्राधान्य देत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करून तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी कळवले आहे. हा राजीनामा संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार आहे.  कार्यकाळात सतत पाठिंबा मिळाल्याचे सांगत धनखड यांनी भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानले. तसेच आपला कार्यकाळ खूप आनंददायी राहिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मी माननीय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचेदेखील आभार मानतो. पंतप्रधानांचे सहकार्य माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान राहिले आहे. मी माझ्या कार्यकाळात त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे. माननीय खासदारांकडून मिळालेला स्नेह, विश्वास आणि आपुलकी माझ्यासाठी नेहमीच अमूल्य राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अमूल्य अनुभव आणि ज्ञानाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. या महत्त्वाच्या काळात भारताच्या अभूतपूर्व आर्थिक प्रगती आणि असाधारण विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी होणे माझ्यासाठी अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. आपल्या राष्ट्राच्या या परिवर्तनीय युगात सेवा करणे हा माझ्यासाठी खरा सन्मान असल्याचे सांगत त्यांनी राजीनामापत्राचा शेवट केला आहे.

जगदीप धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातील शाळेतूनच पूर्ण केले. त्यानंतर शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते चित्तोरगड सैनिक शाळेत शिकण्यासाठी गेले. धनखड यांची राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये निवड झाली होती. मात्र, त्यांनी तो मार्ग स्वीकारला नव्हता. राजस्थान विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वकिली क्षेत्राकडे वळले होते.

2022 पासून उपराष्ट्रपती

जगदीप धनखड यांनी 11 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 6 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. जगदीप धनखड यांना एकूण 725 पैकी 528 मते मिळाली, तर मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली होती. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.

आजपर्यंत अशी प्रथमच घटना…

देशाच्या आजपर्यंतच्या कोणत्याही उपराष्ट्रपतींनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिलेला नाही. धनखड यांच्या बाबतीत प्रथमच असा प्रकार घडला आहे. तसेच संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिला आहे. देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वात राज्यसभा सभागृहाचे काम चालते. मात्र, आता संसदेच्या कामकाजात उपाध्यक्षांना लक्ष घालावे लागणार आहे. यासंबंधी राष्ट्रपती मुर्मू आणि केंद्र सरकार यांना आता तातडीने निर्णय घ्यावा लागेल.

Comments are closed.