'सिंदूर' संसदेत 25 तास चर्चा होईल

केंद्र सरकारची घोषणा, येत्या आठवड्यात शक्यता

वृत्तसंस्था / .नवी दिल्ली

पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या यशस्वी ‘सिंदूर’ अभियानावर येत्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा केली जाणार आहे. केंद्र सरकारने सोमवारी वर्षाकालीन अधिवेशनाच्या प्रथम दिवशी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. लोकसभेत 16 तास, तर राज्यसभेत 9 तास अशी एकूण 25 तास दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे. ते बुधवारपासून चार दिवसांच्या विदेश दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे ते परत आल्यानंतर ही चर्चा केली जाईल. आम्ही चर्चेसाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन सरकारने काही दिवसांपूर्वीच केले होते. या चर्चेत विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला आणि शंकेला सरकारकडून समर्पक प्रत्युत्तर दिले जाईल, अशी शक्यता आहे.

राजनाथ सिंह यांचे विधान

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी पहलगाम हल्ला आणि ‘सिंदूर अभियान’ या दोन्हीवर त्वरित चर्चा करावी, अशी मागणी करत प्रचंड गोंधळ घातला. त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. सरकार याप्रकरणी सविस्तर चर्चेला सज्ज आहे. सर्व पक्षाच्या सदस्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार असून सरकारही त्यांच्या प्रत्येक आरोपाला आणि शंकेला प्रत्युत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहे. विरोधकांनी कामकाजात व्यत्यय आणू नये. सरकार चर्चेपासून दूर जाणार नाही. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही याविषयी स्पष्टता आणली आहे. तथापि, विरोधकांनी घोषणाबाजी करून दबाव आणणे योग्य नाही. सभागृहात शांतता प्रस्थापित झाल्यास कामकाज शक्य होईल, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी त्यांच्या छोट्या वक्तव्यात केले.

राज्यसभेत खडाजंगी

राज्यसभेत या विषयावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये जोरदार शब्दाशब्दी झाली आहे. मी नियम 267 अंतर्गत चर्चेसाठी नोटीस दिली आहे. 22 एप्रिलला पहलगाम हल्ला झाला. मात्र, आजपर्यंत हा हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला अटक करण्यात सरकारला यश आले नाही. हा प्रकार चिंताजनक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 वेळा ‘केवळ माझ्यामुळे संघर्ष थांबला’ असे विधान केले आहे. हा भारताचा अवमान आहे. पण सरकार याविरोधात काहीही बोलत नाही, अशी टीका खर्गे यांनी केली. सरकारकडून त्यांनी स्पष्टीकरणाची मागणी केली.

न•ा यांचे प्रत्युत्तर

सरकार ‘सिंदूर अभियान’ आणि त्याच्या संबंधातील प्रत्येक मुद्द्यावर चर्चेला सज्ज आहे. सरकार चर्चेपासून दूर जात आहे, अशी कोणीही समजूत करून घेऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने हे अभियान यशस्वी केले आहे. पाकिस्तानला मोठा धडा शिकविला आहे. भारताच्या सेनादलांनी जो पराक्रम गाजवला, त्याचा आम्हाला अभिमान आहे. यासंबंधी विरोधी पक्षांच्या ज्या शंका असतील किंवा प्रश्न असतील त्यांना यथायोग्य उत्तर दिले जाईल. विरोधकांनी उगाचच गोंधळ करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधू नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.

संसद अधिवेशनाचा प्रारंभ गोंधळाने

पावसाळी संसद अधिवेशनाला सोमवारी प्रारंभ करण्यात आला आहे. तथापि, प्रथम दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ घालण्यात आला. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे कामकाज चालविणे दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांना कठीण झाले होते. त्यामुळे तीनवेळा त्यांचे कामकाज स्थगित करण्यात आले. अखेरीस दुपारी 3 वाजता ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. प्रश्नोत्तरांचा तास आटोपल्यानंतर गदारोळास प्रारंभ झाला. विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारकडून निवेदनाची मागणी केली. विरोधी खासदारांनी बोलण्यात हस्तक्षेपाचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांना अनुमती न मिळाल्याने त्यांनी दोनवेळा सभात्याग केल्याचे दिसून आले.

अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा

ड भारतीय डाक विधेयकावर लोकसभेत केली जाणार 3 तास चर्चा

ड प्राप्तिकर सुधारणा विधेयकावर चर्चेसाठी 12 तासांचा वेळ घोषित

ड राष्ट्रीय खेळ विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ झाला निर्धारित

ड मणिपूर राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चेसाठी 2 तासांची वेळ निश्चित

ड शुभांशू शुल्काच्या अंतराळस्थानक वास्तव्यावरही विस्तृत चर्चा होणार

ड आणीबाणीला 50 वर्षे झाल्यासंबंधी चर्चेची तेलगु देशमची मागणी

Comments are closed.