वैष्णदेवी तीर्थयात्रा मार्गावर भूस्खलन
एका भाविकाचा मृत्यू , सात जखमी : मुसळधार पावसामुळे दुर्घटना
वृत्तसंस्था/ कटरा
जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे माता वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर भयानक भूस्खलन झाले आहे. माता वैष्णोदेवी भवन मार्ग बाणगंगाजवळ कोसळलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानंतर एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. मृत भाविकाचे नाव के. उपन (70) असे आहे. तो चेन्नई, तमिळनाडू येथील रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली.
हवामानातील बदल आणि सततच्या मुसळधार पावसामुळे माता वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोमवारी सकाळी 8:30 वाजता भाविक माता वैष्णोदेवीला जाण्याचा प्रवास सुरू असताना बाणगंगा परिसरातील गुलशन लंगरजवळ भूस्खलन झाले. अवघ्या काही क्षणात मोठे दगड आणि माती थेट रस्त्यावर पडल्यामुळे एका शेडचे नुकसान झाले. या आपत्तीत एकाचा मृत्यू होण्याबरोबरच दोन स्थानिक रहिवाशांसह 7 भाविक जखमी झाले आहेत. या भूस्खलनात घोडागाडी आणि पालखी इत्यादी सेवा सुरळीत करण्यासाठी एम टेक कंपनीने उभारलेले मुख्य प्रीपेड काउंटर देखील खराब झाले. परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. सध्या भाविकांच्या वाहतुकीसाठी बाणगंगा मार्ग बंद करण्यात आला आहे. सध्या नवीन ताराकोट मार्गावरून माता वैष्णोदेवीची यात्रा सुरळीत सुरू आहे. दुसरीकडे, रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माता वैष्णोदेवीचा महत्त्वाचा बॅटरी कार मार्ग देखील रात्री 12:00 वाजता बंद करण्यात आला. या मार्गावर विविध ठिकाणी खडे, दगड आणि माती कोसळत असल्यामुळे सावधगिरीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Comments are closed.