पालीच्या आरोग्य केंद्रात जखमी, रुग्ण उपचाराविना तीन तास विव्हळत; डॉक्टर सुट्टीवर, सरकारी रुग्णवाहिकेचा पत्ता नाही

पालीच्या डॉक्टर सुट्टीवर गेल्याने रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर गेली आहे. रविवारी एक आदिवासी तरुण उपचाराविना तीन तास विव्हळत होता. अखेर खवली येथील डॉक्टरांना बोलावून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात जाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. मात्र रुग्णवाहिकेचा पत्ताच नसल्याने नातेवाईकांची त्रेधातिरपीट उडाली.

गंभीर अवस्थेतील रोशन पवार याला पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दुपारी आणण्यात आले. मात्र यावेळी येथे एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते. रोशनच्या कानातून रक्तस्त्राव होत होता. त्याच्या पाठीवर मारहाणीच्या खुणादेखील होत्या. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने दवाखान्यातील बाकड्यावर तो विव्हळत होता. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमित गायकवाड यांना समजल्यानंतर ते आरोग्य केंद्रात आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता दोन डॉक्टर ड्युटीवर असल्याचे परिचारिकांनी सांगितले. पैकी डॉ. प्रियंका गवळी या रीतसर रजेवर होत्या, तर डॉ. अभिजीत तळेकर हे मोबाईल बंद करून गायब होते. दरम्यान रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याने नातेवाईकांनी गोंधळ घातला. यानंतर परिचारिकांनी खवली येथील डॉ. शुभम चिवेगावे यांना फोन करून बोलावून घेतले.

अॅम्ब्युलन्स गायब

कुटुंबीयांनी लगेचच 108 व 102 या अॅम्ब्युलन्सला संपर्क केला. मात्र दोन्ही अ‍ॅम्ब्युलन्स क्रमांकाची 102 क्रमांकाची रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन अलिबागला गेली होती. शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांनी पदरमोड करून खासगी अ‍ॅम्ब्युलन्समधून अलिबागला हलवले.

माझ्याकडे जेव्हा याबाबतची तक्रार आली तेव्हा पाली केंद्रात तात्पुरते डॉक्टर पाठवले. गैरहजर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. – लता मोहिते, गटविकास अधिकारी, सुधागड

Comments are closed.