आरोही, वैष्णवी, आराध्या, अवनी, शिप्रा, स्वरा यांची आगेकूच

आरोही मोरे, वैष्णवी मांगलेकर, आराध्या ढेरे, अवनी शेट्टी, शिप्रा कदम, स्वरा मोरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी मंगळवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिल्या फेरीत बोरीवलीच्या आरोही मोरेने पुण्याच्या सायली जोशीचा 15-03, 15-10 असा, तर नागपूरच्या वैष्णवी मांगलेकरने दिविजा रेपालचा 15-04, 15-03 असा पराभव केला. पुण्याच्या आराध्या ढेरे हिने आपली शहर सहकारी वल्लरी वाटाणेचा 15-04, 06-15, 15-07 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. ठाण्याच्या अवनी शेट्टी हिने टिया उग्रणकरचा 06-15, 15-10, 15-12 असा कडवा प्रतिकार केला. साताऱयाच्या आर्या कर्णे हिने पुण्याच्या स्वराली मांडेला 15-05, 15-03 असे पराभूत केले. पुण्याच्या शिप्रा कदमने अनुश्री मोडलिंबकरला 15-05, 15-06 असे नमविले. पुण्याच्या स्वरा मोरे याने ठाण्याच्या विश्वती नमनाचा 15-09, 15-06 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. 15 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत अक्वल मानांकित नाशिकच्या विश्वजीत थविलने धुळ्याच्या जनक अग्रवालचा 15-11, 15-13 असा पराभव केला. पुण्याच्या समीहन देशपांडेने आदेश एकाडेचा 15-05, 15-09 असा, तर ठाण्याच्या पार्थिव बिरादारने पुण्याच्या अक्षत श्रीवास्तवचा 15-12, 15-13 असा पराभव केला. साताऱयाच्या श्लोक भोसले याने रिधान पुंगलियावर 15-08, 20-18 असा विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत पुण्याच्या सम्यक मनगुडकर याने धाराशिवच्या रितेश जाधवचा 15-12, 14-16, 16-14 असा पराभव केला.
Comments are closed.