महायुती सरकार भिकारी! माणिकरावांच्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद; बळीराजा भडकला… राज्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन
विधिमंडळ अधिवेशनात ऑनलाईन ‘जंगली रमी’ गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच पीक विम्यासाठी एक रुपया घेणारे सरकारच भिकारी असल्याचे वक्तव्य करत कोकाटे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. दरम्यान, कृषीमंत्र्यांविरुद्ध संतापाचा भडका उडला असून बळीराजाने राज्यभर ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आज उग्र निदर्शने केली. तर राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीच्या कायकर्त्यांनी कोकाटे यांच्या घरासमोर धडक दिली.
‘जंगली रमी’ खेळण्यामुळे अडचणीत सापडलेल्या कोकाटे यांनी मंगळवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत बोलताना केलेल्या ‘‘हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण इथे आम्ही फक्त एका रुपयात पीक विमा देतो,’’ या वक्तव्यावरदेखील स्पष्टीकरण करताना कोकाटे यांनी ‘‘शेतकऱयांकडून शासन एक रुपया घेते. सरकार शेतकऱयांना एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? सरकारच भिकारी आहे, शेतकरी नाही,’’ असे सांगत महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला.
…तर हिवाळी अधिवेशनात राजीनामा
अपूर्ण व्हिडिओ दाखवून विरोधकांकडून माझ्यावर आरोप केले जात आहेत. ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलो नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. सभागृहात मोबाईल बघताना ऑनलाईन रमीचा गेम आला, तो मला स्किप करता आला नाही. मी तो स्किप करण्याचा प्रयत्न करत होतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करा, असे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांना देणार आहे. त्यात मी रमी खेळत असल्याचे सिद्ध झाले, मी दोषी आढळलो तर त्यांनी नागपूरच्या अधिवेशनात निवेदन करावे, त्याच क्षणाला राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन, असे कोकाटे म्हणाले.
फडनाविस संतप्त
कोकाटे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. कुठल्याही मंत्र्याने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. पीक विम्याबाबत अतिशय चुकीची माहिती पसरली गेली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था चांगली आहे. आपण श्रीमंत आहोत, आपल्याकडे खूप पैसा आहे असे नाही. मात्र जी विकसनशील राज्ये आहेत त्यांच्या तुलनेत आपली स्थिती नक्कीच चांगली आहे,
असे फडणवीस म्हणाले.
ऑनलाईन रमी काय, माहीत आहे काय?
मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना कोकाटे म्हणाले, हा छोटा विषय असून एवढा लांबला का, हे कळत नाही. ऑनलाईन रमी तुम्हाला माहिती आहे का? त्याला बँकेचे खाते जोडावे लागते. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या ऑप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, असे कोकाटे म्हणाले.
राजीनामा द्यायला मी विनयभंग केला का?
मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोणाचा विनयभंग केला का? काही गुन्हा केला का? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का? असे प्रतिप्रश्न कोकाटे यांनी उपस्थित करत कोकाटे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावला. एक व्हिडिओ व्हायरल करून माझी बदनामी केली जात आहे. त्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे कोकाटे म्हणाले.
शिवसैनिकांनी कोकाटेंच्या अंगावर पत्ते फेकले
नाशिकरोड येथील दुर्गा गार्डन भागात एका कार्यक्रमासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आले होते. हे कळताच संतप्त शिवसैनिक तेथे पोहोचले. कृषीमंत्री कोकाटे यांचा धिक्कार असो, माणिकराव कोकाटे राजीनामा द्या, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकले. या आंदोलनाने पोलीस व अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली. शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असतानाही मंत्री मतदारसंघात फिरकले नाही, ते रमी खेळण्यात रमले असल्याने त्यांना पत्ते दिले, असे या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अस्लम (भैया) मणियार यांनी सांगितले. त्यांच्यासह योगेश देशमुख, नीलेश शिरसाट यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
Comments are closed.