आशिया कप रद्द झाल्यास पाकिस्तानचं मोठं नुकसान होणार? जाणून घ्या या स्पर्धेमधून PCB किती कमाई करणार
शनिवार (26 जुलै) रोजी आशिया कप 2025 (Asia Cup) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. वेळापत्रक जाहीर होताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) जोरदार टीका होऊ लागली. आता ही बाब राजकीय वळणही घेत आहे, कारण विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. सोशल मीडियावरही मोठा वाद सुरू झाला असून, अनेकजण म्हणत आहेत की भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळूच नये. या सगळ्या गदारोळात आता पुन्हा एकदा आशिया कप रद्द होण्याच्या शक्यतेने जोर धरला आहे.
जर आशिया कप रद्द झाला, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. सुरुवातीला भारताला या स्पर्धेची यजमानी मिळणार होती, मात्र आशियाई क्रिकेट परिषद (ACC) च्या बैठकीत BCCI ने सामन्यांचं आयोजन ‘न्यूट्रल वेन्यू’वर करण्यास होकार दिला होता. भारतीय चाहत्यांचा आणि विरोधकांचा दबाव वाढल्यास BCCI ने ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा मोठा आर्थिक फटका पाकिस्तानला बसू शकतो.
या वर्षी ICC आणि ACC कडून मिळणाऱ्या वाट्याच्या उत्पन्नातून PCB ला सुमारे 880 कोटी पाकिस्तानी रुपये मिळण्याची अपेक्षा होती. तसेच आयसीसी (ICC) कडून सुमारे 25.9 मिलियन डॉलर्स (770 कोटी रुपये) मिळण्याची शक्यता होती. आशिया कपमधून सुमारे 116 कोटी रुपये कमावण्याची PCB ला अपेक्षा होती. याचबरोबर अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून सुमारे 77 लाख रुपये कमाई होण्याची शक्यता होती.
ICC आणि ACC कडून मिळणारी ही रक्कम पाकिस्तान क्रिकेटच्या आर्थिक स्थितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जर आशिया कप रद्द झाला, तर केवळ 116 कोटी रुपयांचे नुकसान होणारच, शिवाय याचा परिणाम ICC इव्हेंट्स आणि इतर क्रिकेट कार्यक्रमांवरही होऊ शकतो.
आशिया कप 2025 ची यजमानी भारताकडे होती. पण, पहलगाममधील अतिरेकी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता कमी वाटत होती. त्यामुळे केवळ भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना नव्हे, तर पूर्ण आशिया कपच रद्द होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण ACC च्या बैठकीनंतर BCCI ने टूर्नामेंट ‘न्यूट्रल वेन्यू’वर आयोजित करण्यासाठी होकार दिला.
Comments are closed.