मँचेस्टर टेस्टमध्ये शतक ठोकून गिलने रचला इतिहास, 35 वर्षांनंतर एखाद्या भारतीयाने केली अशी कामगिरी!
भारतीय कर्णधार शुबमन गिलने इतिहासात आपले नाव कोरले आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्यात गिलने पाचव्या दिवशी शतक झळकावले. या शतकासोबतच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर एखाद्या भारतीय फलंदाजाने या मैदानावर शतक ठोकले आहे. याआधी 1990 मध्ये सचिन तेंडुलकरने ओल्ड ट्रॅफर्डवर शतक झळकावले होते.
शुबमन गिलने मँचेस्टर टेस्टमध्ये 228व्या चेंडूवर शतक पूर्ण केले. या शतकी खेळीत भारतीय कर्णधाराच्या बॅटमधून 12 चौकार निघाले. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी उभं राहून गिलच्या शतकाला टाळ्यांचा गजर करत मान दिला. या मालिकेतील गिलचं हे चौथं शतक ठरलं आहे.
यासोबतच शुबमन गिलने टेस्ट मालिकेत सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. इंग्लंडविरुद्ध चालू मालिकेत गिलने आपले चौथे शतक झळकावले आहे. भारतासाठी एका टेस्ट मालिकेत सर्वाधिक शतकांचा विक्रम संयुक्तपणे सुनील गावसकर आणि विराट कोहली यांच्या नावावर आहे. गावसकरने दोन वेळा वेस्ट इंडिजविरुद्ध एकाच मालिकेत चार शतकं ठोकली होती, तर विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट मालिकेत चार शतकं झळकावली होती.
Comments are closed.