WCL 2025 – आधीही खेळलो नाही, आताही खेळणार नाही.. INC Vs PNC सामन्यावर शिखर धवनच तडाखेबंद उत्तर

एकीकडे टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे World Championship of Legends (WCL) 2025 चा रणसंग्राम सुरू आहे. या स्पर्धेत हिंदुस्थान चॅम्पियन्ससह दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, वेस्ट इंडिज चॅम्पियन्स, इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स या सहा संघांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा सध्या हिंदुस्तान-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आल्यामुळे चर्चेत आली आहे. याच दरम्यान टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि हिंदुस्थान चॅम्पियन्स संघाचा फलंदाज शिखर धवनने पुन्हा एकदा तडाखेबंद वक्तव्य करत पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे.
हिंदुस्थान चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यामध्ये 20 जुलै रोजी सामना खेळला जाणार होता. परंतु या सामन्यातून शिखर धवन, हरभन सिंह, युसूफ पठान, इरफान पठान आणि सुरेश रैना यांनी माघार घेत पाकिस्ताविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे आयोजकांनी सामनाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा शिखर धवनने यासंदर्भात भाष्य करत आपले स्पष्ट केले आहेत. पत्रकाराशी संवाद साधत असताना त्याला विचारण्यात आलं की, तुम्ही हिंदुस्थान-पाकिस्तान या संभावित सेमी फायनलमध्ये खेळणार का? त्यावर शिखर धवन म्हणाला की, “भाई, तुम्ही चुकीच्या ठिकाणी हा प्रश्न विचारत आहात. जर तु हे विचारत आहेस, तर तुला वाटतं का मी याच उत्तर देईन. आणि जर मी आधी खेळलो नसेन तर, आताही खेळणार नाही.” असं म्हणत शिखर धवनने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे.
WCL 2025 स्पर्धेच्या गुणतालिकेचा विचार करता सध्या पाकिस्तान चॅम्पियन्स संघ 7 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. पाकिस्तान चॅम्पियन्सने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत तर, हिंदुस्थान चॅम्पियन्सविरुद्धचा त्यांचा सामना रद्द झाला. या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स, तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज चॅम्पियन्स, पाचव्या क्रमांकावर इंग्लंड चॅम्पियन्स आणि सहाव्या क्रमांकावर हिंदुस्थान चॅम्पियन्स या संघांचा समावेश आहे. हिंदुस्थान चॅम्पियन्सने 3 सामन्यांपैकी दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे त्यांच्या खात्यात 1 पॉइंटचा समावेश आहे.
Comments are closed.