मुंबई-गोवा महामार्गावर आरवली ते संगमेश्वर मार्गावर गणेशोत्सवापूर्वी होणार मलमपट्टी; आंदोलन तुर्तास टळले
संगमेश्वर पोलीस ठाणे येथे महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि महामार्गावरील समस्यांविषयी आंदोलन करणारे आंदोलक यांची रविवारी बैठक झाली. आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बाधीत होते या विचाराने संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दोन्ही पक्षांना चर्चेसाठी आमनेसामने बसवले. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी कुलकर्णी , पाटील, आणि अन्य संबंधित विभागाचे स्थानिय अधिकारी उपस्थित होते. तर आंदोलनकर्ते म्हणून राहुल रविंद्र गुरव, राजेंद्र पोमेंडकर , विवेक शेरे, रौफ खान, गणपत चव्हाण,बाळू इंदुलकर,प्रज्योत पवार, महेंद्र चकरी, वैभव चव्हाण व तालुक्यातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.
चर्चेत कामाची गुणवत्ता, संरक्षक उपाययोजना, आजवर अपघात क्षेत्रात मार्ग फलक नसल्याने झालेले अपघात , शाळा विद्यालये यांच्या लगतच्या रस्त्यावर खड्डेमय तरण तलावातून सुटका, रहदारीच्या रस्त्यावर खोदून ठेवलेले खड्डे काम पूर्ण झाल्यानंतर बुजवणे अथवा काम सुरू असल्यास बॅरीगेट लावणे. दगड मातीची वाहतूक ही ओव्हरलोड करु नये. आरवली ते संगमेश्वर या रस्त्यावर कोठेही असलेले खड्डे येत्या दहा बारा दिवसांत तात्पुरत्या स्वरूपात भरणे. याशिवाय उपस्थित व्यक्ती स्वतः जातीने ठरलेल्या कामांची पाहणी करणार आहे.
मिळालेल्या आश्वासनांमुळे हे आंदोलन तुर्तास मागे घेतले असले तरी अनागोंदी अशीच सुरू राहिली तर तालुक्यातील जनसामान्यांच्या सहकार्याने पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फु़कणार, हे आज उपस्थित अधिकारी वर्गाला ठणकावून सांगण्यात आले. दिलेल्या आश्वासनाची जाण ठेवून चाळण झालेल्या आरवली ते संगमेश्वर या मार्गावर रखडलेले काम सुरू करावे , खड्डेमय महामार्ग खड्डेमुक्त करून येत्या गणेशोत्सवात गावाला येणाऱ्या चाकरमान्यांना आणि रोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना आराम मिळावा ही आंदोलन कर्त्यांची मागणी आहे.
Comments are closed.