मोठी बातमी! देशातील ‘या’ बड्या कंपनीत नोकरकपात, 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

टाळेबंदीची बातमीः टाटा समूहाची आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम येत्या काही महिन्यात हजारो कर्मचाऱ्यांच्या (employees) नोकऱ्यांवर (Job) होऊ शकतो. कंपनीने स्पष्ट केले आहे की ती 2026 या आर्थिक वर्षात (एप्रिल 2025 ते मार्च 2026) त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के कपात करणार आहे. याचा थेट परिणाम 12000 हून अधिक कर्मचाऱ्यांवर होईल.

सध्या कंपनीत सुमारे 6.13 लाख कर्मचारी काम करत आहेत. त्यानुसार, सुमारे 12 हजार 200 लोकांना कपातीचा फटका बसू शकतो. ही कपात टीसीएसच्या सर्व देशांना आणि कार्यक्षेत्रांना प्रभावित करेल, जिथे कंपनी काम करत आहे.

माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णय : टीसीएसचे सीईओ के. कृतिवासन

टीसीएसचे सीईओ के. कृतिवासन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आपण नवीन तंत्रज्ञानाकडे, विशेषतः एआय आणि ऑपरेटिंग मॉडेलमध्ये बदलांकडे वाटचाल करत आहोत. यामुळे काम करण्याची पद्धत बदलत आहे आणि आपल्याला स्वतःला अधिक चपळ आणि भविष्यासाठी तयार बनवावे लागेल. त्यांनी हे देखील मान्य केले की कंपनीने कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्याचा आणि त्यांना पुन्हा नियुक्त करण्याचा प्रयत्न केला. परंतू, काही भूमिका अशा होत्या जिथे हे शक्य नव्हते. म्हणून, ही टाळेबंदी आवश्यक झाली. त्यांच्या मते, हा निर्णय प्रामुख्याने मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर परिणाम करेल. सीईओंनी याला “माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात कठीण निर्णय” म्हटले आहे.

नेमकी का केली जातेय नोकरकपात?

टीसीएसने म्हटले आहे की ते प्रभावित कर्मचाऱ्यांना नोटिस कालावधी वेतन तसेच अतिरिक्त विच्छेदन पॅकेज, आरोग्य विमा आणि आउटप्लेसमेंट सहाय्य प्रदान करेल. टाळेबंदीचे कारण एआय नाही तर पुनर्कौशल्य आणि तैनातीतील मर्यादा आहेत. कंपनी म्हणते की ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना नवीन काळातील कौशल्ये शिकवण्यासाठी सतत गुंतवणूक करत आहेत. परंतू सर्व भूमिका नवीन योजनेत बसत नाहीत.

नवीन धोरणामुळे चिंता वाढली

टीसीएसने अलीकडेच लागू केलेल्या नवीन बेंच धोरणामुळे कर्मचाऱ्यांसाठी तणाव निर्माण झाला आहे. 12 जून 2025 पासून लागू होणाऱ्या या धोरणानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याला एका वर्षात 225 बिल करण्यायोग्य दिवस पूर्ण करावे लागतील. म्हणजेच, कंपनीला थेट महसूल देणाऱ्या प्रकल्पावर त्यांना एका वर्षात किमान इतके दिवस काम करावे लागेल. याशिवाय, बेंचवर राहण्याचा (म्हणजे प्रकल्पाबाहेर राहण्याचा) कालावधी आता फक्त 35 दिवसांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. पूर्वी हा कालावधी खूप जास्त होता. या धोरणामुळे हजारो कर्मचाऱ्यांनाही त्रास होण्याची शक्यता आहे, विशेषतः जे नवीन प्रकल्प मिळेपर्यंत बेंचवर राहतात.

भारतीय कर्मचाऱ्यांवरही कपातीचा परिणाम होईल का?

कंपनीने भारतातील किती कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसेल हे सांगितले नसले तरी, भारत हा TCS चा सर्वात मोठा कर्मचारी वर्ग असल्याने, त्याचा परिणाम येथेही नक्कीच दिसून येईल असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच, मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील ही कपात कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांसाठी चिंतेचे कारण असू शकते.

महत्वाच्या बातम्या:

Layoff: भारतातील ‘या’ दिग्गज कंपनीनं उचललं मोठं पाऊल, 700 कर्मचाऱ्यांना झटक्यात दिला नारळ

आणखी वाचा

Comments are closed.