कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 कर्णधार, जाणून घ्या, नंबर वन कोण?
कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) कर्णधारपद निभावणं हे काही सोपं काम नाही. पण काही दिग्गज खेळाडू असेही झाले, ज्यांनी कर्णधारपदाचा दबाव आपल्या फलंदाजीवर कधीच जाणवू दिला नाही आणि धावांचा अक्षरश पाऊस पाडला. आज आपण टेस्ट क्रिकेटमधील अशाच एका अनोख्या विक्रमाबद्दल बोलणार आहोत. टेस्ट मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांबद्दल. या यादीत ऑस्ट्रेलिया, भारत आणि वेस्ट इंडिजसारख्या देशांतील महान कर्णधारांची नावं सामील आहेत.
सर डॉन ब्रॅडमन – द अॅशेस (1936-37)
कसोटी क्रिकेटचे देव म्हणून ओळखले जाणारे सर डॉन ब्रॅडमन (Sir Don bradman) यांनी 1936-37 च्या अॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांतील 9 डावांमध्ये तब्बल 810 धावा फटकावल्या होत्या. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 270 होती आणि सरासरी 90.00 होती. या मालिकेत त्यांनी 3 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले. एका कसोटी मालिकेत कर्णधाराकडून करण्यात आलेल्या सर्वाधिक धावांचा हा विक्रम आजही अबाधित आहे.
ग्राहम गूच – इंग्लंड विरुद्ध भारत, 1990
इंग्लंडचे माजी कर्णधार ग्राहम गूच (Graham Gooch) यांनी 1990 मध्ये भारताविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 752 धावा केल्या. लॉर्ड्सवरील सामन्यात त्यांनी 333 धावांची भेदक खेळी साकारली, जी त्यांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्यांनी या मालिकेत 3 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आणि त्यांची सरासरी 125.33 होती.
सुनील गावसकर – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, 1978-79
भारताचे महान सलामीवीर आणि कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी 1978-79 च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेत 732 धावा केल्या. 6 सामन्यांतील 9 डावांमध्ये त्यांनी 4 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले. या मालिकेत त्यांची 91.50 सरासरी होती आणि त्यांच्या या कामगिरीमुळे भारताला मालिकेत ड्रॉ साधता आला.
डेव्हिड गॉवर – अॅशेस, 1985
इंग्लंडचा स्टायलिश डावखुरा फलंदाज डेव्हिड गॉवर (David Gower) यांनी 1985 च्या अॅशेस मालिकेत कर्णधार म्हणून जबरदस्त फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्यांनी 732 धावा केल्या. त्यात 3 शतके आणि 1 अर्धशतक होते आणि त्यांची 81.33 सरासरी होती. या कामगिरीने इंग्लंडला मालिकेत आघाडी मिळवून दिली.
सर गॅरी सोबर्स – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, 1966
वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स (Sir Gary Sobers) यांनी 1966 साली इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 722 धावा केल्या होत्या. त्यांनी यामध्ये 3 शतके आणि 2 अर्धशतके साकारली. त्यांच्या फलंदाजीची 103.14 सरासरी होती. जी त्यांच्या अष्टपैलूतेचं उत्तम उदाहरण होती.
Comments are closed.