21व्या शतकातील सर्वात मोठा विक्रम! केएल राहुल आणि शुबमन गिलने रचला इतिहास
केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. मँचेस्टर टेस्टच्या दुसऱ्या डावात गिल आणि राहुल यांच्यात 188 धावांची भागीदारी झाली. मात्र ही भागीदारी फक्त धावांची नव्हे, तर त्यांनी चेंडूंवर आधारित 21व्या शतकातील सर्वात मोठा विक्रम रचला आहे. या दोघांनी मिळून 188 धावांची भागीदारी करताना एकूण 417 चेंडू खेळले, जे मागील 25 वर्षांमध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कोणत्याही टेस्ट सामन्यात भारतीय फलंदाजांनी केलेल्या भागीदारीत सर्वाधिक चेंडू आहेत.
मँचेस्टर टेस्टमध्ये भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन पहिल्याच षटकात बाद झाले होते. त्यामुळे शुबमन गिल आणि केएल राहुल यांची ही ऐतिहासिक भागीदारी पहिल्याच षटकापासून सुरू झाली. दोघांनी मिळून या भागीदारीदरम्यान एकूण 417 चेंडू खेळले. याआधी हा विक्रम राहुल द्रविड आणि संजय बांगर यांच्या नावावर होता. त्यांनी 2002 साली हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर 405 चेंडू खेळत 170 धावा जोडल्या होत्या. त्यांच्या खालोखाल सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचा नंबर लागतो, ज्यांनी 357 चेंडूंमध्ये 249 धावांची भागीदारी केली होती.
आता इंग्लंडच्या भूमीवर कोणत्याही भागीदारीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. राहुलने या मालिकेत इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 2 शतके ठोकली आहेत, मात्र दुर्दैवाने तो मँचेस्टर टेस्टमध्ये शतक पूर्ण करू शकला नाही. तो 90 धावांवर खेळत असताना बेन स्टोक्सने त्याला एल्बीडब्ल्यू आऊट केलं.
भारतीय कर्णधार शुबमन गिल ही मालिका सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. एकीकडे गिलने मालिकेत 700 धावांचा टप्पा पार केला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे, ज्याने आतापर्यंत 511 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर देखील भारतीय फलंदाज रिषभ पंत आहे.
Comments are closed.