पोलिसांची पुण्याच्या हॉटेलमध्ये ‘ट्रॅप पार्टी‘, खडसेंच्या जावयाच्या अटकेने राजकारण तापले

शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या खराडीतील एका हॉटेलवर पोलिसांनी एक पार्टी ‘ट्रॅप’ करत छापा टाकला. या ‘ट्रप पार्टी’तून पोलिसांनी 2.70 ग्रॅम कोकेन, 70 ग्रॅम गांजा, हुक्का सेट, मद्य, मोबाईल, चारचाकी वाहने असा एकूण 41 लाखांचा मुद्देमालही जप्त केला. येथून पोलिसांनी सातजणांना अटक केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे. या अटकेने राजकारण तापले आहे.

पोलिसांनी 2.70 ग्रॅम कोकेन, 70 ग्रॅम गांजा, हुक्का सेट, मद्य, मोबाईल व चारचाकी वाहने असा एकूण 41 लाख 35 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (41, रा. हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (35, रा. माळवाडी रोड), समीर फकीर महमंद सय्यद (41, रा. एनआयबीएम रोड), सचिन सोनाजी भोंबे (42, रा. वाघोली), श्रीपाद मोहन यादव (27, रा. आकुर्डी) यासह अन्य दोन महिलांना अटक केली आहे. त्यांच्यावर ‘एनडीपीएस’ अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खराडीतील स्टेबर्ड अझुर सूट हॉटेल येथे पथकाने सापळा रचून मध्यरात्री छापा टाकला. या गुह्याचा सूत्रधार कोण आहे, याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. बारी यांनी आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

असं काही घडेल असं वाटतंच होतं एकनाथ खडसे

जावई प्रांजल खेवलकरला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी, ‘या प्रकरणाबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही, पण असं काही घडेल असं वाटतंच होतं,’ अशी प्रतिक्रिया दिली. आपण केलेल्या आरोपांमुळेच हे घडवले जातेय अशी शक्यता नाकारता येत नाही, पण सत्य बाहेर आलेच पाहिजे, मग तो जावई असो वा कुणी असो,  असे खडसे म्हणाले. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, पण जर यामागे षड्यंत्र असेल तर ते उघडकीस आले पाहिजे, असेही खडसे म्हणाले.

खोली बुकिंग आणि एकमेकांची ओळख

हॉटेलमध्ये 25 ते 27 जुलैपर्यंत खेवलकर यांच्या नावे दोन रूम बुक होत्या. तसेच पार्टी करण्यासाठी एकत्र आलेले सर्व जण हे एकमेकांच्या परिचित असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींपैकी यादव व पोपटाणी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून यादव याच्यावर गॅम्बलिंग अॅक्ट तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल आहे, तर पोपटाणी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तो बुकी असल्याची माहिती आहे.

पाचशे रुपयांचा गांजा, सहा ते सात हजारांचे कोकेन

संबंधित ठिकाणाहून पोलिसांनी 70 गॅम गांजा पकडला. याची किंमत बाजारात पाचशे ते आठशे रुपये एवढी आहे, तर 2.70 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची पाच ते सात हजार एवढी किंमत आहे.

वैद्यकीय अहवाल अन् फॉरेन्सिक तपासणी

पार्टी करताना आढळलेल्या सर्वांची पोलिसांनी मेडिकल तपासणी केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांनी किती प्रमाणात सेवन केले होते, याची माहिती समोर येईल. तर त्यांच्याकडे आढळलेल्या गांजा आणि कोकेनसदृश पदार्थांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.

सिव्हिल ड्रेसवरील काहीजण माझ्यावर पाळत ठेवून होते प्रांजल खेवलकर

मला जाणीवपूर्वक अडकवले जात आहे. केवळ राजकीय संबंधांमुळे माझ्यावर कारवाई केली जात आहे. माझ्याकडे कोणताही अमली पदार्थ सापडलेला नव्हता, असा दावा प्रांजल खेवलकर यांनी केला आहे. आज न्यायालयात याप्रकरणी झालेल्या सुनावणीत खेवलकर यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली. यापूर्वी सिव्हिल ड्रेसवर काही लोक माझ्यावर पाळत ठेवून मला अडकवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. यापूर्वीही आपल्याला तीन वेळा अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

हा सगळा प्रकार प्लँटेड खेवलकर यांच्या वकिलाचा हक्क

हा सर्व प्रकार प्लँटेड असून डॉ. प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यासाठीच हे सगळं रचलं आहे, असा दावा डॉ. खेवलकर यांचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. रक्ताच्या अहवालानंतर खेवलकर यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असेही ते म्हणाले.

Comments are closed.