पंतप्रधान राजेंद्र चोल जयंती उत्सवांमध्ये भाग घेतात
बृहदेश्वर मंदिरात पंतप्रधान मोदींनी केली पूजा : अण्णाद्रमुक महासचिवांशी चर्चा
वृत्तसंस्था/ चोलपुरम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी तामिळनाडूत राजेंद्र चोल यांच्या जयंती सोहळ्यात सामील होत चोल राजांच्या विदेश धोरण आणि व्यापारी संबंधांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. चोल राजांनी श्रीलंका, मालदीव आणि दक्षिणपूर्व आशिया यासारख्या क्षेत्रांसोबत स्वत:चे राजनयिक आणि व्यापारी संबंध अत्यंत मजबूत केले होते. चोल साम्राज्याचा विस्तार केव्ळ भारतापुरती मर्यादित नव्हता, तर त्यांनी समुद्र पार करत भारताची समृद्ध संस्कृती सामर्थ्य पोहोचविले होते. हे भारताच्या प्राचीन सामर्थ्य आणि दूरदर्शी नेतृत्वाचे प्रतीक असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील बृहदेश्वर मंदिरात दर्शन घेत पूजा केली. भगवान बृहदेश्वरच्या चरणी पूजा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. 140 कोटी देशवासीयांचे कल्याण आणि भारताच्या निरंतर प्रगतीसाठी प्रार्थना केली आहे. सर्वांना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळावा अशी माझी कामना असल्याचे मोदींनी नमूद केले. हे मंदिर चोल वंशाच्या स्थापत्यकलेचे अद्भूत उदाहरण असून मोदींचा हा दौरा भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या सन्मानाचे प्रतीक मानला जात आहे.
सन्मानार्थ नाणे जारी
ऐतिहासिक चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांना आदरांजली वाहत पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी त्यांच्या सन्मानार्थ विशेष नाणे जारी केले. हे नाणे सम्राटाचे महान योगदान आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाला सन्मान देण्याच्या उद्देशाने जारी करण्यात आले आहे. तामिळनाडूच्या गंगैकोंडा चोलपुरम मंदिरात मोदींनी महान चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या जयंती सोहळ्यात भाग घेतला. हा उत्सव आदि तिरुवाथिरै सणानिमित्त साजरा करण्यात आला. राजेंद्र चोल यांनी साम्राज्याला मजबूत करत दक्षिण भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त केले होते. गंगैकोंडा चोलपुरम मंदिर चोल घराण्याची शक्ती, संस्कृती आणि कलेचे प्रतीक आहे.
पलानिस्वामी यांची भेट
अण्णाद्रमुक महासचिव पलानिस्वामी यांनी शनिवारी रात्री विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले आणि यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली आहे. चालू वर्षी एप्रिल महिन्यात अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्यात आघाडी झाली होती. त्यानंतर पलानिस्वामी यांनी पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच भेट घेतली आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत विजयानंतर स्वबळावर सरकार स्थापन करणार असल्याचे अण्णाद्रमुकचे सांगणे आहे. तर रालोआचा विजय झाल्यास राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याची भाजपची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
भूतकाळ महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश
गंगैकेंडा चोलपुरम मंदिर 1 हजार वर्षापूर्वी निर्माण करण्यात आले होते. हजार वर्षांपूर्वी महान चोल राजा राजेंद्र चोल यांच्या सैन्याकडून पूर्ण कडारम क्षेत्र, वर्तमान कंबोडिया, म्यानमार आणि थायलंडवर विजय प्राप्त करण्याचे प्रतीक म्हणजे हे मंदिर आहे. भूतकाळ महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या दौऱ्यातून दिला असल्याचे भाजप नेते के. अण्णामलाई म्हटले आहे. मोदींच्या दौऱ्यावरून द्रमुकने राजकारण करू नये असे म्हणत अण्णामलाई यांनी रुग्णालयात दाखल मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन हे लवकर बरे व्हावेत अशी कामना व्यक्त करत असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून निधी जारी करण्याची विनंती केली होती.
Comments are closed.