ना गिल, ना जडेजा, ना सुंदर… मॅंचेस्टरमध्ये 'या' खेळाडूला मिळाला 'प्लेयअर ऑफ द मॅच'चा सन्मान!

भारत विरुद्ध इंग्लंड मँचेस्टर कसोटीत एकेकाळी भारताला पराभवाचा सामना करावा लागणार होता. खेळाचे 5 सत्र बाकी होते. दुसऱ्या डावात भारताचे धावांचे खातेही उघडले नव्हते तेव्हा यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या रूपात दोन मोठे धक्के बसले. रिषभ पंत फलंदाजीला येईल की नाही याबद्दल काहीही माहिती नव्हते. अशा परिस्थितीत इंग्लंड खूप मजबूत स्थितीत दिसत होते. तथापि, या सर्वांच्या उलट, भारतीय फलंदाजांनी 5 सत्रे फलंदाजी केली आणि सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले. कर्णधार शुबमन गिल व्यतिरिक्त, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चौथ्या डावात शतके झळकावली. तथापि, या तिघांपैकी कोणालाही ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला नाही.

मँचेस्टर कसोटीत यजमान संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भारताविरुद्धच्या या सामन्यात स्टोक्सने 141 धावांची शानदार खेळी खेळली आणि 5 बळी घेतले.

बेन स्टोक्सच्या कसोटी कारकिर्दीतील हा बारवा सामनावीर पुरस्कार आहे. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याशिवाय, इयान बोथमनेही त्याच्या कारकिर्दीत तेवढेच सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. स्टार फलंदाज जो रूट 13 सामनावीर पुरस्कारांसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

इंग्लंडसाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार

13 – जो रूट
12- इयान बोथॅम
12- बेन स्टोक्स
10 – केविन पीटरसन
10 – स्टुअर्ट ब्रॉड

बेन स्टोक्ससाठी ही मालिका बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्तम राहिली आहे. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तो एका मालिकेत 300 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 15 पेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला कर्णधार बनला आहे. त्याचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 358 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने जो रूट आणि बेन स्टोक्सच्या शतकांच्या मदतीने 669 धावा केल्या आणि भारतावर 311 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात टीम इंडियाने 0 धावांवर 2 विकेट गमावल्या. त्यानंतर असे वाटले की भारत हा सामना डावाच्या फरकाने गमावू शकतो. परंतु केएल राहुल, शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताला हा पराभव टाळता आला. चौथ्या दिवसाचे दोन सत्र आणि पाचव्या दिवसाचे तीनही सत्र भारताच्या नावावर होते. टीम इंडियाने चौथ्या डावात 4 विकेट गमावून 425 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. भारताकडून शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतके केली.

Comments are closed.