आयएसआय-लिंक्ड तस्करीची टोळी
अमृतसरमध्ये पाच जणांना अटक : शस्त्रास्त्रांसह रोख रक्कम जप्त
► वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाब पोलिसांनी केंद्रीय संस्थांच्या सहकार्याने एक मोठे यश मिळवताना शस्त्रास्त्रे आणि ड्रग्ज मनीच्या सीमापार तस्करीशी संबंधित मोठ्या नेटवर्कमधील पाच जणांना अटक केली आहे. सदर तस्करांकडून शस्त्रास्त्रे आणि रोख स्वरुपातील लाखो रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. अमृतसर ग्रामीण पोलिसांनी केंद्रीय संस्थांच्या सहकार्याने पाकिस्तान-आयएसआय समर्थित कार्यकर्त्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रs आणि ड्रग्ज मनीच्या एका मोठ्या सीमापार तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केल्याचे पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी स्पष्ट केले आहे.
पंजाबमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत जोबनजीत सिंग, गोरा सिंग, शेनशान, सनी सिंग आणि जसप्रीत सिंग अशा पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रs आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. ज्यामध्ये दोन मॅगझिनसह एक एके सायगा 308 असॉल्ट रायफल, चार मॅगझिनसह दोन ग्लॉक 9 एमएम पिस्तूल, एके रायफलचे 90 जिवंत काडतुसे, 9 एमएम कॅलिबरचे 10 जिवंत काडतुसे, 7.50 लाख रुपये रोख रक्कम, एक कार आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
प्राथमिक तपासात या तस्करांचे पाकिस्तानस्थित आयएसआय कार्यकर्त्यांशी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. ‘जप्त केलेले साहित्य गँगस्टर जग्गू भगवानपुरियाचा सहकारी नव उर्फ नव पंडोरी याला पोहोचवण्यात येणार होते, यावरून दहशतवादी आणि गुंड एकत्र काम करत असल्याचे दिसून येते, असे डीजीपी यादव यांनी सांगितले.
जग्गू भगवानपुरियाविरुद्ध 120 हून अधिक गुन्हे
गुरदासपूर येथील जगदीप सिंग उर्फ जग्गू भगवानपुरियाविरुद्ध 120 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन यांचा समावेश आहे. विविध माध्यमांच्या वृत्तांनुसार, तो पंजाबचा कुख्यात गुंड मानला जातो आणि लॉरेन्स बिश्नोईचा मार्गदर्शक देखील मानला जातो.
सीमापार हेरॉइन तस्करीच्या आणखी एका मॉड्यूलचा पर्दाफाश करणाऱ्या एका वेगळ्या मोठ्या कारवाईच्या एक दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अटारी येथे भारत-पाकिस्तान सीमेजवळ हेरॉइनची वाहतूक करताना पाकिस्तानस्थित तस्करांशी थेट संबंधित चार प्रमुख गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती.
Comments are closed.